हिमायतनगर,अनिल मादसवार| तालुक्यातील पळसपूर येथील 33 के. व्ही. विद्दुत केंद्रावरून घारापुर कडे जाणाऱ्या एक्सप्रेस फिडर लाईन पोलचे काम अत्यंत बोगस करण्यात आले आहे. केवळ रस्त्याच्या पाच फूट दूरवर पोल उभे करून करण्यात आले असून, नुकत्याच झालेल्या पावसाच्या पाण्याने आणि हलक्याश्या वादळाने अनेक पोल जमिनीकडे झुकले तर काही ठिकाणी खाली पडले आहेत.


अर्धापूर- माहूर या राष्ट्रीय महामार्ग वरील घारापुर येथील वळण रस्त्याला लागून करण्यात आलेल्या नूतन लाईनचे पोल जमिनीकडे झुकले असून, या ठिकाणी रात्रीला वाहन जात असताना पोलला धडकून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. सुदैवाने हा खांब रस्त्याकडे झुकला, हाच खांब जर शेतात पडला असता तर एखाद्या शेतकऱ्याचा जीव घेण्यास कारणीभूत ठरला असता. अश्या बोगस कामाची कार्यकारी अभियंता यांनी चौकशी करून संबंधितावर कार्यवाही करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वामनराव पाटील मिराशे यांनी नांदेड न्यूज लाइव्हशि बोलताना केली आहे.


हिमायतनगर तालुक्यात अशा प्रकारे रस्त्याला लागूनच खांब उभे करण्याचे पाप संबंधित कंत्राटदाराने केले असून, थातुर माथूर पद्धतीने खड्डे करून काम उरकत बिले काढण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यात अश्या पद्धतीने महावितरण विभागातील तत्कालीन अभियंत्याच्या संगनमताने झालेल्या बोगस कामाकडे लोकप्रतिनिधीनी देखील दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अल्पवधीतच खांब आडवे झाल्याने बोगस कामाचे पितळे उघडे पडले आहे. आता तरी जागरूक लोकप्रतिनिधींनी हिमायतनगर तालुक्यात एक्स्प्रेस फिडर लाईनसह इतर पोल उभे करण्याच्या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका होणार नाही अशा पद्धतीने दर्जेदार काम करून सुरक्षेची हमी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
