श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। उज्जैन येथून देवदर्शन आटोपून माहूर कडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्र ५३ वरील खामगाव जि बुलढाणा बायपासच्या खातखेड फाट्याजवळ रस्त्यावर तांत्रिक बिघाड झाल्याने बंद पडलेल्या ट्रकवर मागून भरधाव वेगाने येणारी इर्टीगा कार धडकून झालेल्या भीषण अपघातात गाडीतील तीन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी तसेच तीन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना १३ मे च्या उत्तररात्री १.४८ वाजे दरम्यान घडली.


याबाबत नांदुरा पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी निलेश आंदुसिंग राठोड वय ४२वर्षे रा. नाईक नगर हेटी तालुका आर्णी जि. यवतमाळ यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांचे नातेवाईक पांढऱ्या रंगाची इर्टीगा कार क्रं एम एच २६-सि इ-६२४५ ने उज्जैन येथून देवदर्शन करून गावाकडे परत येत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील खामगाव बायपासच्या खातखेड फाट्याजवळ ट्रक क्रं एम पी-०९-डि एम १३६२ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रकच्या टायरचा रिमोट पट्टा निघाल्याने कोणतीही सुरक्षितता न बाळगता तसेच इंडिकेटर न लावताच सदरचे वाहन निष्काळजीपणे रस्त्याच्या मध्यभागी लावले असल्याने मागून भरधाव वेगाने येणाऱ्या इर्टीगा चालकाला बंद पडलेल्या ट्रकचा अंदाज न आल्याने कार ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक एवढी भीषण होती की गाडी समोरुन पूर्णपणे चकनाचूर झाली.

या अपघातात गाडीतील देवराव गंगाराम पवार वय ६०वर्षे, बबीता देवराव पवार वय ५५ वर्षे, निकेतन देवराव पवार वय २६ वर्षे रा लोकरवाडी ता माहूर जि नांदेड हे तिघे जागीच ठार झाले. तर मोनिका जीवन राठोड वय ३२वर्षे रा किनवट, भूमिका रामराव राठोड वय १८ वर्षे, प्रियंका देवराव पवार वय ३० वर्षे रा किनवट, हिताशी जीवन राठोड वय २वर्षे रा किनवट तर इर्टीगा चालक संतोष भगवान कदम वय ३९वर्षे, रा करंजी, ता माहूर जि नांदेड हे पाच जण जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विलास पाटील, पोहेकॉ काशीनाथ जाधव, वाहतूक शाखेचे वाघमारे यांच्यासह १०८ रुग्णविहिकेचे डॉ शेख, चालक गणेश वनारे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत अपघातातील जखमींना मदत करीत अधिक उपचारासाठी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविले. याप्रकरणी आरोपी ट्रक चालकाविरुद्ध नांदुरा पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम २८१, १०६ (१), १२५ (अ), (ब) २२४ (४), ३२५ (५) यांच्यासह मोटर वाहन अधिनियमाच्या १८४, १३४/१७७, १२२/१७७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून या अपघात प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ उमेश भारसाखळे हे करीत आहेत.
