नांदेड| आजारी असलेल्या रुग्णांना व त्याच्या नातेवाईकांना जीवनदायी योजना या नावातच खुप काही स्पष्ट दिसून येते आणि त्यांच्या आशा बळावतात. महाराष्ट्र राज्यात सन २०१३ मध्ये दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने ही योजना सुरु करण्यात आली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते.

नंतर युती सरकारच्या काळात या योजनेच्या नावात बदल करून सन २०१७ मध्ये महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना या नावाने योजना सुरु ठेवण्यात आली होती. परंतु १ जुलै २०२४ पासून एकात्मिक आयुष्मान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणून सध्यस्थितीत ही जीवनदायी योजना सुरु आहे.

राज्यात साधारणतः १२०० पेक्षा अधिक कर्मचारी आरोग्य मित्र म्हणून काम करीत आहेत. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) नेते कॉ.डॉ. डी.एल.कराड अध्यक्ष आणि कॉ.किरणकुमार ढमढेरे सरचिटणीस यांच्या नेतृत्वात १२ फेब्रुवारी पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. सीटू संलग्न महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटना म्हणून शासन दरबारी संघटनेची नोंद असून संघटनेच्या वतीने मागील काही वर्षांपासून राज्यातील आरोग्य मित्र रीतसर शासनाकडे विविध संविधानिक मागण्या करीत आहेत.

परंतु कामगार कर्मचाऱ्याप्रति उदासीन असलेले शासन व सरकार लक्ष देण्यास तयार नसल्यामुळे शेवटी संपाचे हत्यार आरोग्य मित्रांनी उपसले आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आरोग्य मित्रांना किमान वेतना प्रमाणे २६ हजार रुपये दरमहा पगार देण्यात यावा.वेतनवाढ दरवर्षी १० टक्के करण्यात यावी.वाहन भत्ता देण्यात यावा.आजारपण,किरकोळ,विशेष अधिकार व सनाच्या सर्व रजा देण्यात याव्यात.मागील १२ ते १५ वर्षांपासून आरोग्य मित्र सेवा देत आहेत परंतु त्यांना अद्याप अनुभव प्रमाणपत्र देण्यात आले नाही तसे अनुभव प्रमाणपत्र देण्यात यावे.आदी प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या सीटू च्या वतीने सातत्याने करण्यात येत आहेत.

या संपाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरु असलेल्या सीटूच्या बेमुदत साखळी उपोषणाच्या ठिकाणी दि.१९ जानेवारी रोजी कॉ.उज्वला पडलवार अध्यक्ष व कॉ.गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्य मित्रांची बैठक घेण्यात आली असून संपाची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. संपाच्या दिवशी म्हणजे १२ फेब्रुवारी रोजी आरोग्य मित्रांचे उपरोक्त मागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया समोर दुपारी १२ वाजता तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत. अशी माहिती सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.