नांदेड l गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून अनेक नागरिक आपली कामे व तक्रारी घेऊन जिल्हा परिषदेत येत असतात. त्यांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांच्या निर्देशानुसार ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.


उन्हाच्या तीव्रतेचा विचार करता जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेशही यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांदी दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालना नजीक अभ्यागतांसाठी विशेष दालन उपलब्ध असून येथे बसण्याची सुविधा तसेच वृत्तपत्रे वाचण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळावा व नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
