नांदेड| तळणी पोस्ट लिंबगाव स्टेशन ता.जि.नांदेड येथील पीडित वयोवृद्ध कॉ.व्यंकटी डोंपले यांनी २ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालया समोर बेमुद्दत उपोषण सुरु केले होते. डोंपले यांचे घर गावातून उठविण्यासाठी गावातील सरपंच,ग्रामसेवक, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व काही स्वतःला प्रतिष्ठित समजणारे गावातील नागरिक प्रयत्नशील होते.
मागील ४० वर्षांपासून मातंग समाजाचे डोंपले यांचे कच्चे घर जिल्हा परिषद शाळेजवळ आहे. शाळेला कुंपन बांधकामासाठी निधी मंजूर झाल्यामुळे ऐन आचारसंहिते मध्ये गरीबाचे घर कपाउंड मध्ये घेऊन त्यांना बेघर करण्याचा डाव अखण्यात आला आहे. यापूर्वी आचारसंहिते मध्ये पीडितांनी स्वगृही उपोषण केले आहे. कुणीही दखल घेत नसल्यामुळे त्यांनी सीटू कामगार संघटनेच्या नेत्यांची भेट घेऊन संघटनेचे सभासदत्व स्वीकारले आणि प्रशासना विरुद्ध झुंज सुरु केली.
१९ डिसेंबर रोजी सीटूच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. तेव्हा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र काढून तातडीने दखल घ्यावी आणि आपल्या अधिनिस्त उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियुक्ती करून अहवाल सादर करावा तसेच या प्रकरणात जैसे थे स्थिती राहील याची दक्षता घ्यावी. असा आदेश पारित केला आहे.
यामुळे पीडित व्यंकटी भिवाजी डोंपले यांना दिलासा मिळाला असून या कामी सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड, जिल्हाध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, कॉ. जयराज गायकवाड, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.श्याम सरोदे आदींनी प्रयत्न केले असून गरीब कुटुंबाला न्याय मिळवून दिला अशी प्रतिक्रिया उपोषणार्थी डोंपले यांनी दिली आहे.गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक व इतर कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी पुढे आली आहे. अण्णा भाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश कावडे आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांनी देखील उपोषण सोडविण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. पुढील लढा हा जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यां विरुद्ध राहील असे कॉ.गायकवाड यांनी बोलून दाखविले आहे.