उमरखेड | लोकविकास समन्वय संघर्ष समिती आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) च्या वतीने दि.८ ऑक्टोबर रोजी नाग चौक येथून दुपारी एक वाजता नगर परिषद उमरखेड वर धडक मोर्चा काढण्यात आला.
उमरखेड नगर परिषद क्षेत्रातील लोकशाहीर डॉ.कॉ.अण्णा भाऊ साठे मागासवर्गीय गृह निर्माण संस्थे मध्ये मागील २५ वर्षांपासून कोणत्याही नागरी सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. तेथे रस्ते, नाल्या, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, खेळाचे मैदान,ओपन स्पेश, सौचालय, घरकुल आदी मूलभूत आणि नागरी सुविधा स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात पुरविण्यात आल्या नाहीत. सदरील मागासवर्गीय व मातंग समाजाची वस्ती असलेला परिसर हा माजी आमदार देवसरकर यांच्या घरा शेजारी असलेल्या धोंगडे पीर जवळ आहे. उपरोक्त साठे नगरासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासन खुपच उदासीन आहे.
शासनाकडून दलित वस्तीसाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली असताना देखील तेथील रहिवास असणाऱ्या पीडितांना अजून नगर परिषदेच्या वतीने घर नंबर देखील देण्यात आले नाहीत. अनुसूचित जाती साठी आरक्षित असलेल्या उमरखेड विधानसभा मतदार संघात साठे नगरतील मातंग समाज आजही विकासापासून कोसोदूर आहे.शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सदरील मोर्चा काढण्यात आला असून असून कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. उमरखेड शहरातून दलित वस्ती असलेल्या साठे नगर (मागासवर्गीय गृह निर्माण संस्था) येथे जाण्यासाठी रस्ता नाही भवानी मंदिर व जो पांदन रस्ता आहे, तो तात्काळ पक्का व नाली करण्यात यावी.
वस्ती मधील अंतर्गत रस्ते करावेत. साठे नगर येथे मागील २० वर्षांपासून दलित लोक राहतात त्यांना अजून घर नंबर देण्यात आले नाहीत त्यांना घर नंबर व घर टॅक्स पावती देण्यात यावी. खेळाचे मैदान, उद्यान, अभ्यासिका, अंगणवाडी, बालवाडी, शाळा व इतर उचभ्रू वस्ती मध्ये असणाऱ्या सर्व सुविधा निर्माण करण्यात याव्यात.
वस्ती मध्ये दोनशे बाय दोनशे स्केवर फुटाचा कॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी नियोजित प्लॉट्स आहे तेथे दर वर्षी जयंती होत असते तेथे समाज मंदिर व अभ्यासिका बांधून देण्यात यावी.विद्युत खांब वाढविण्यात यावेत व स्ट्रीट लाईट बंद आहे ती चालू करावी. नळाच्या पाईप लाईन वाढवून देण्यात याव्यात. सार्वजनिक सौचालय व घरकुल बांधून देण्यात यावेत आदी मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला.
सामूहिक आमरण उपोषणास नागरिक बसणार होते परंतु मुख्याधिकारी श्री महेश जामनोर व उप मुख्याधिकारी श्री एन.डी. चव्हाण यांनी आश्वासने देऊन उपोषणार्थिंचे मन परिवर्तन केल्यामुळे व लेखी पत्र दिल्यामुळे उपोषणास स्थगिती देण्यात आली. या आंदोलनास मार्गदर्शन करण्यासाठी कॉ.विजय गाभने, कॉ. उज्वला पडलवार हे उमरखेड येथे आले होते व त्यांनी मोर्चास संबोधित केले.तर भारत मुक्ती मोर्चा चे विद्वान केवटे यांनी पाठिंबा दिला.
यावेळी कॉ. गंगाधर गायकवाड, कॉ. नारायण साबळे, कॉ. ज्योती जोगदंड,कॉ. रत्नमाला गायकवाड,कॉ. पंडित जोगदंड, कॉ. संतोष पवार, कॉ. उज्वला जोगदंड, कॉ. रवी काळे, कॉ. शारदा साबळे, कॉ. नंदा कांबळे आदींची भाषणे झाली. पाठिंबा देण्यासाठी कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ. श्याम सरोदे, कॉ. जयराज गायकवाड, कॉ. बबन वाहुळकर, कॉ. चांदु लोखंडे, कॉ. साहेबराव गजभारे आदिजन उपस्थित होते.