हिमायतनगर। समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत चालू असलेली २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थी निवड यादी ही बोगसरीत्या तयार करण्यात आली असून काही तालुक्यांना जास्तीचे लाभार्थी दिले व हिमायतनगर तालुक्यातील लाभार्थी कमी प्रमाणात निवडले याबाबत निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी अर्जदार गंगाधर गायकवाड,विजय वाठोरे,अनिल कांबळे यांनी निवेदन हिमायतनगर चे गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारीजि. प. नांदेड व जिल्हाधिकारी यांना दिले आहे.


नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती मार्फत सर्व तालुक्यांमध्ये चालू असलेली योजना २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थी निवड यादी ही जिल्हा परिषद येथील समाज कल्याण विभागात लावण्यात आली आहे. या यादीवरून हिमायतनगर तालुका सोडता इतर सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आलेला दिसून येत आहे. तसेच एकाच परिवारातील अनेक सदस्यांना सर्व योजनेत सामील करून घेत त्यांना लाभ मिळवून देण्याचा खटाटोप निवड अधिकारी करत असल्याचे दिसून येत आहे.


हिमायतनगर तालुक्यातील साडेतीनशे पैकी फक्त नऊ अर्ज मंजूर करण्यात आले व इतर तालुक्यांमध्ये पंधरा ते वीस अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे हिमायतनगर तालुक्यातील लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे. तसेच गेल्या वर्षी निवड झालेल्या लाभार्थ्यांना अजूनही कोणत्याही योजनेची रक्कम प्राप्त झाली नाही. समाज कल्याण विभागातील अधिकारी कामचूकारपणा करत असल्यामुळे एक ते दीड वर्ष होऊनही लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही ही शोकांतिका आहे. या बाबीकडे जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय मीनल जी करणवाल मॅडम व जिल्हाधिकारी माननीय अभिजीत राऊत साहेब यांनी गांभीर्याने दखल घेऊन हा प्रश्न निकाली लावण्याची गरज आहे.

समाज कल्याण विभागातील २० टक्के शेस अंतर्गत योजनेतील लाभार्थी निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करू असा इशारा अर्जदार गंगाधर गायकवाड,विजय वाठोरे, अनिल कांबळे यांनी निवेदनातून दिला आहे.
