हिमायतनगर| येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयच्या राज्यशास्त्र विभागाच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन घेण्यात आले. या प्रसंगी राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख व कार्यक्रमाचे संयोजक डॉ. एल. बी. डोंगरे यांनी भारतीय संविधानाचे प्रास्ताविकेच्या माध्यमातून महत्त्व पटवून देत असतांना म्हणाले की, आपल्या संविधानाने भारत देश अखंडित राहिला. कारण घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जात, धर्म, वंश, व भाषा अशा विविधतेने नटलेल्या देशाला एकसंध ठेवण्याचे काम भारतीय संविधानातुन केले आहे.
आज आपल्या देशाला संविधान स्वीकारून 75 वर्षे पूर्ण झालेले आहेत. तरीही आजतागायत संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार चालताना आपणास दिसून येतो आहे. संविधानामुळे आपल्या देशामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, आणि न्याय निर्माण होण्यास मदत झाली. म्हणून संविधान हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन म्हणून सिद्ध झालेले आहे. संविधानाने व्यक्तीच्या व्यक्तिमत्व विकासाची व त्यांच्या हक्काची व्यवस्था करुन ठेवली आहे. व्यक्तींच्या हक्का बरोबरच देशाच्या विकासात त्याचे योगदान देण्यासाठी त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव सुद्धा करून दिलेली आहे.
संविधान हे देशातील सर्व नागरिकांचे संरक्षण करणारे सर्वात मोठे साधन आहे. असे सविस्तर मत त्यांनी मांडले. आणि शेवटी सामुदायिक रीत्या संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम ह्या लाभल्या होत्या. तसेच महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारीव तसेच अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कार्यक्रमाला उपस्थित होते.