नांदेड| माहूर येथील जगदंबा धर्म शाळेत दि.७ आणि ८ जानेवारी रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे १२ वे जिल्हा अधिवेशन मोठ्या उत्साहात सुरु होऊन पार पडले. कॉ.सीताराम येचूरी नगर कॉ. कुमार शिराळकर मंच येथे भरलेल्या या अधिवेशनात कॉ.शंकर सिडाम यांची तिसऱ्यांदा एकमताने फेर निवड करण्यात आली.
यावेळी निरीक्षक म्हणून पक्षाचे व शेतकऱ्यांचे नेते कॉ.डॉ.अजित नवले,राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. किसन गुजर,कॉ.सुनील मालुसरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथम व खुल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठवाड्याचे नेते तथा राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. विजय गाभने हे होते.
सुरवातीला दुपारी १२.३० वाजता पक्षाच्या ध्वजाचे झेंडा वंदन करून सलामी देण्यात आली. त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय महासचिव दिवंगत कॉ.सीताराम येचूरी, पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री कॉ.बुद्धदेव भट्टाचार्य,भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंघजी,किनवट माहूरचे माजी आमदार प्रदीप नाईक, परभणी दंगलीतील शहीद, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासह ज्ञात अज्ञातांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
सदरील अधिवेशनात निवडक १०७ प्रतिनिधी उपस्थित होते. सचिवांनी सादर केलेल्या अहवालावर २४ प्रतिनिधीनी चर्चा केली. विविध ठराव मांडण्यात आले असून ते सर्व ठराव एकमताने ते पारित करण्यात आले. दोन दिवशीय चाललेल्या या अधिवेशनात १७ अधिक ५ जणांची जिल्हा कमिटी निवडण्यात आली. महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार) चे माजी नांदेड जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, कृषि उत्पन्न बाजार समिती माहूर चे सभापती दतराम मोहिते,भाराकॉ चे नेते डॉ.निरंजन केशवे यांनी अधिवेशनाच्या खुल्या सत्रास शुभेच्छा दिल्या.
अधिवेशनाचा समारोप डॉ.अजित नवले यांच्या जोशपूर्ण भाषणाने झाला. सूत्रसंचालन कॉ. उज्वला पडलवार यांनी तर आभार कॉ.अमोल आडे यांनी मांडले अशी माहिती माकप जिल्हा कमिटी सभासद तथा नांदेड तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी माहूर तालुका कमिटीने परिश्रम घेतले असून जनसंघटनेच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले आहे.