नांदेड| जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज श्रीक्षेत्र माळेगाव येथे आयोजित यात्रेस भेट देऊन आनंद व उत्साहाचा अनुभव घेतला. त्यांनी श्रीखंडोबाचे दर्शन घेतले आणि यात्रेतील विविध उपक्रमांचा आढावा घेतला.
यात्रेदरम्यान घोडेबाजारातील विविध घोड्यांची पारख करत त्यांनी या अनोख्या परंपरेचे कौतुक केले. तसेच शंकरपट स्पर्धेस भेट देऊन स्पर्धकांचे मनोबल वाढवले. यात्रेच्या चैतन्यमय वातावरणाने व सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला वेगळाच रंग दिला आहे. या प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले, पोलीस निरीक्षक नीलपञे, कार्यकारी अभियंता संजय शिंदे, गट विकास अधिकारी दशरथ आडेराघो, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचे स्वीय सहायक शुभम तेलेवार उपस्थित होते. यात्रेतील गर्दी, विविध स्टॉलची सजावट व पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमांनी माळेगाव यात्रा आनंदोत्सवाचे मूर्त रूप ठरली आहे.
माळेगाव यात्रेत विविध शासकीय योजनेचे स्टॉल जिल्हा परिषदेचा उपक्रम; नागरिकांकडून प्रतिसाद
माळेगाव यात्रेत येणाऱ्या भाविकांना देवदर्शन, मनोरंजन आणि खरेदी विक्रीचा आनंद लुटण्याबरोबरच जिल्हा परिषद प्रशासनाने शेतकरी, पशुपालक, शिक्षण, आरोग्य स्वच्छता, महिला बाल विकास, समाजकल्याण आदी विभागांचे स्टॉल उभारले आहेत. या स्टॉल मधून विविध शासकीय योजनांची माहिती अधिकारी व कर्मचारी देत आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व आरोग्यसेवांची सचित्र माहिती उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, जमिनी सुरक्षा, शिशु योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम, गर्भलिंग निदान कायदा, आयुष्यमान कार्ड आदी बाबतची माहिती या स्टॉल मधून यात्रेकरूंना दिली जात आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार देखील केले जात आहेत. येथे कलापथकाच्या माध्यमातूनही शाहीर जोंधळे आरोग्यविषयक जनजागृती करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेत महिला व बालकांच्या विविध योजनेसह पोषण आहाराबाबत स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी विविध पौष्टिक व पोषण आहाराचे पदार्थ बनवून ठेवण्यात आले आहेत. तसेच अंगणवाडी केंद्राची प्रतिकृती उभारून अंगणवाडीचे प्रत्यक्ष चित्रण येथे भाविकांना सांगितले जात आहे अंगणवाड्यांमधून बालकांवर केले जाणारे संस्कार व आहाराविषयी माहिती दिली जात आहे. समाज कल्याण विभागाच्या वतीने व्यसनमुक्ती दारूबंदी याविषयी जनजागृती स्टॉल व कलापथकाद्वारे प्रबोधन केले जात आहे. या सर्व स्टॉललाही याञेकरु भेट देत आहेत.