उस्माननगर, माणिक भिसे। जांब ते शिरूरताजबंद रोडवर शुक्रवार ३० जानेवारी रोजीची घटना ताजी असताना काल दि .२ फेब्रुवार रोजी मध्यरात्री गोव्यावरुन छ. संभाजीनगरकडे परत येताना करवीर तालुक्यातील कांडगाव येथे खाजगी बस उलटून झालेल्या अपघातात उस्माननगर ता.कंधार येथील अमोल परशुराम भिसे ( ४०) वर्षीय युवकांचा मृत्यू झाल्याची बातमी समजताच परिसरात शोकाकुल वातावरण झाले.

मिळालेल्या वृत्तानुसार गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरकडे परतणारी खासगी बस करवीर तालुक्यातील कांडगाव येथे रविवारी मध्यरात्री उलटून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. अमोल परशुराम भिसे (वय ४०, रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या अपघातात ३० पेक्षा जास्त जण जखमी आहेत. यातील चार जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

प्रत्यक्षदर्शी आशिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी कंपनीतील सुमारे १४३ कर्मचारी ३० जानेवारीला चार खासगी बसमधून सहलीसाठी गोव्याला गेले होते. रविवारी सायंकाळी साडेसात वाजता ते गोव्यावरून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने परत निघाले. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कणकवलीमध्ये जेवण केले. तेथून फोंडा घाट मार्गे कोल्हापूरकडे ते निघाले. तेथून छत्रपती संभाजीनगरकडे ते निघाले होते.

यातील एक बस (डी. डी. ०१/ टी. ९३३३) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास कांडगाव येथे वळण घेताना उलटली. या बसमध्ये ३५ प्रवासी होते. यात तीन महिलांचा समावेश होता. सर्व प्रवासी २५ ते ४० या वयोगटातील होते. बस उलटून अपघात झाल्याचे समजताच तेथील ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी जमले. यावेळी एकजण जागीच ठार झाल्याचे निदर्शनास आले.

उस्माननगर येथील भूमिपुत्र अमोल परशुराम भिसे हा लहानपणा पासून हुशार होता. त्याचे बारावी पर्येतचे शिक्षण गावतच झाले. आयटीआय करून (औरंगाबाद) छत्रपती संभाजीनगर येथील ए. एस. आर. कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर या पदावर कार्यरत होता. त्यांच्या पश्चात आई, बाबा , दोन भाऊ, पत्नी ,मुलगा, असा परिवार आहे . उस्माननगर येथील स्मशानभूमीत सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उस्माननगर येथील तीन चार दिवसांत जवान दोन यूवक अपघातात मृत्यू झाल्याने परिसरात शोकाकुल वातावरण व हळहळ व्यक्त होत आहे.