नांदेड। भ्रष्ट्राचाराने बहुचर्चित ठरलेल्या नांदेडच्या सामाजिक वनीकरण विभागात मैत्रीपूर्ण संबंधांपाठोपाठ आत्ता सोयरपणातून स्वतःचे चांगभलं करण्याचा अट्टहास येथिल काही अधिकारी- कर्मचारी करित असल्याचा प्रत्यय सातत्याने येत असून बिलोलीच्या वनक्षेत्रपाल शीतल डोंगरे तसेच,मुदखेडचे वनक्षेत्रपाल श्रीकांत जाधव यांच्याकडील अतिरिक्त कार्यभारामूळे त्यांना जणू नांदेडचा मोहच सूटेनासा झाल्याची चर्चा या निमित्ताने रंगत असली तरिही त्यांच्या सुमार कार्यप्रणालीवर वरिष्ठांसह येथिल विभागीय वन अधिकाऱ्यांकडूनही कोणतीच ठोस कारवाई नसल्याची बाब या विभागातूनच दबक्या आवाजात चर्चीत आहे.
सविस्तर वृत्त असे की, वर्षभरापूर्वी भोकरपाठोपाठ हदगांव-हिमायतनगर तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आलेल्या वृक्ष लागवड व संगोपन कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर भोकर व हदगांव- हिमायतनगरच्या तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्यांसह तत्कालीन प्रभारी विभागीय वन अधिकारी व त.कार्यरत सहाय्यक वनसंरक्षक आशिष हिवरे यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन लोकप्रतिनिधीसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते व जागरुक वनप्रेमींतून तक्रारी वाढल्याने या विभागाच्या वरिष्ठांकडून सदरील प्रकरणात चौकशीचाही फार्स करण्यात आला होता.थेट कारवाई टाळून त्यातील दोषींना पून्हा निलंबन बहाल करतांना त्यासाठीच्या खास नियमांचे पालन करण्यात आले.यासाठी संबंधित दोषींच्या स्थानिकस्तरावर कार्यरत असलेल्या काहींनी चांगलाच कागदोपत्री मेळ जमविल्याचे खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. त्यासाठी स्थानिक व वरिष्ठांच्या मैत्रीपूर्ण संबधांचीही किनार होती असे अनेकांतून बोलल्या जाते.
तत्कालीन प्रभारी विभागीय वन अधिकारी व त.कार्यरत सहाय्यक वनसंरक्षक आशिष हिवरे यांना निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडील विभागीय वन अधिकारी या पदाचा अतिरिक्त कार्यभार स्थानिक वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांना तर, सहा. वनसंरक्षक या पदाचा अतिरिक्त कार्यभार हदगांव-हिमायतनगरमध्ये तक्रारीत नमूद कालावधीत अतिरिक्त कार्यभार सांभाळलेल्या उमरीचे तत्कालीन कार्यरत वनक्षेत्रपाल गजानन पानपट्टे यांना देण्यात आला होता.परंतू,काही कालावधीनंतर सहाय्यक वनसंरक्षक या पदांचा अतिरिक्त कार्यभार मुदखेडचे वनक्षेत्रपाल श्रीकांत जाधव यांना मिळाल्याने त्यांनीही संबंधित दोषींसमवेत मैत्रीपूर्ण संबधातून कार्यभाग साधल्याचे समजते.
दरम्यान विभागीय वन अधिकारी या रिक्त पदावर संदिप चव्हाण हे रुजू झाल्यानंतरही सहा.वनसंरक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार जाधव यांच्याकडेच कायम ठेवण्यात आला होता.परंतू, सदरिल रिक्त पदावर शुभांगी लोणकर या रुजू झाल्याने नांदेडात बस्तान बांधण्याचे मनसूबे गमावलेल्या जाधवांनी नांदेडच्याच वनक्षेत्रपाल श्रीमती रुद्रावार यांच्या बदलीने रिक्त झालेल्या पदासाठी बदलीहून वा नव्याने अधिकारी येण्याच्या मार्गात खोडा टाकून सदरील पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळवून स्वतःची घरवापसी टाळण्यात यशस्वी होतांनाच त्यासाठी त्यांना स्थानिक वरिष्ठांसमवेतच्या सोयरपणाचा लाभ झाल्याची चर्चा आहे.
जाधव यांनी नांदेडमधील सहाय्यक वनसंरक्षक व नांदेड परिक्षेत्राच्या वनक्षेत्रपाल या दोन्ही महत्वाच्या रिक्त पदांवर तर,बिलोलीच्या वनक्षेत्रपाल शीतल डोंगरे यांना विभागीय वन अधिकारी कार्यालयातील वनक्षेत्रपाल (विशेष कार्य) या रिक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यासाठीच्या प्रयत्नात बरेच कांही दडल्याची कुजबूज सुरु असून त्यांनी मूळ पदस्थापनेसह या पदावरही सुमार कामगिरी करित आहेत.मात्र स्थानिक वरिष्ठांना हाताशी धरुन अतिरिक्त कार्यभारातून प्राप्त पदे सांभाळताना यापूर्विच्या अधिकारी व कर्मचारी यांचे प्रकरणनिहाय दोष व त्रुटी दडवून त्यांच्या योग्यतेची पूर्तता कागदोपत्री सोपस्कारात पूर्ण करण्याची कर्तव्यतत्परता चोखपणे बजावून मैत्रीपूर्ण संबध जोपासीत धन्यता मानत असल्याने याबाबत या विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी चर्चेनुरुप जोर धरत आहे.
वरिष्ठांची मेहरनजर ! – महत्वाची बाब म्हणजे,नांदेड वनविभागातच यापूर्वि बोधडी येथे कामकाज सांभाळतांना श्रीकांत जाधव यांनी सदरील विभागात अधिकारी-कर्मचारी संघटनेच्या महत्वपूर्ण पदावर कार्यरत असल्यानेच संभाव्य परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर येथिलच सामाजिक वनीकरण विभागात बदलीसाठी प्रयत्नशील राहून मुदखेडमध्ये रुजू झाले असले तरिही येथिल वरिष्ठांच्या रिक्त पदावर अतिरिक्त कार्यभारातून खुर्चीसाठी ते सातत्यपूर्णपणे प्रयत्न करित होते.
त्यांच्या यापूर्वीच्या कार्यकाळातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन त्यांना वरिष्ठ पदाचा अतिरिक्त कार्यभार मिळूच नये यासाठी जिल्ह्यातील मोठ्या राजकीय सर्वेसर्वा यांना साकडे घातल्यानंतर याबाबतची एका वृत्तपत्रातून छायाचित्रासह प्रसिद्धी देण्यात आली होती. परंतू,जाधव यांच्यावर यापूर्वीच्या व कार्यरत पदांच्या कार्यकाळातील कामाबाबत कारवाई दूरच सदरच्या तक्रारीनुसार साधी चौकशीही नाही व तक्रारीत नको त्याच पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांना देऊन या विभागाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर मेहरनजर असल्याचे दाखवून देतांनाच तक्रारकर्त्यासह त्यांचे मोठे प्रस्थ असलेल्या स्थानिक राजकीय नेतृत्वालाही जणू त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या होत्या हे विशेष.
दोघांचीही सोय ! – नांदेड परिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल व नांदेडच्याच विभागीय वन अधिकारी कार्यालयातील वनक्षेत्रपाल तथा,वनपरिक्षेत्र अधिकारी (विशेष कार्य ) अशी दोन्ही पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्यांना ती सोपविल्यास सोयीस्कर ठरले असते.परंतू, नांदेडच्या वनक्षेत्रपाल या रिक्त पदावर मुदखेडचे वनक्षेत्रपाल श्रीकांत जाधव यांना तर, विभागीय वन अधिकारी कार्यालयातील रिक्त पदी नांदेडहून तब्बल ७० किलोमीटर अंतरावरील बिलोलीच्या वनक्षेत्रपाल शीतल डोंगरे यांना अतिरिक्त कार्यभार मिळाल्याने मूळ पदस्थापनेच्या आपल्या मुख्यालयी वास्तव्या ऐवजी नांदेडातूनच ती आपली कर्तव्यतत्परता (!) दाखवून देत असून या अतिरिक्त कार्यभारातून स्थानिक वरिष्ठांनी या दोघांचीही जणू सोयच केल्याचे स्पष्ट होते.