
नांदेड| भोकर विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या इच्छुक उमेदवार श्रीजया चव्हाण यांचा भोकर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांनी सत्कार केला.


राज्याचे उपमुख्यमत्री राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोकर येथे आयोजित कार्यक्रमासाठी जीवन घोगरे पाटील हे भोकर येथे गेले होते. भोकर विधानसभा मतदार संघात महायुतीकडून श्रीजयाताई चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री भाजपचे खा. अशोक चव्हाण यांचा भोकर हा पारंपारिक मतदार संघ राहिलेला आहे.


त्यामुळे या मतदार संघातून अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजयाताई चव्हाण यांना उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्या अनुषंगाने मतदार संघात भेटी-गाठी देत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपसह महायुतीतील इतर मित्रपक्षाकडूनही या मतदार संघात श्रीजयाताई चव्हाण यांच्या नावाला दुजोरा दिला जात आहे.


जीवन घोगरे पाटील यांनी भोकर येथे श्रीजयाताई चव्हाण यांची भेट घेऊन सत्कार केला व आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतील अशा शब्द दिला. यावेळी प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे, तालुकाध्यक्ष राजेश्वर देशमुख, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष आनंद डांगे,प्रवीण घुले, अतुल हिमगिरे, मयूर कोकरे, संदीप नवघडे आदींची उपस्थिती होती.




