School Teachers : जि.प. प्रा. शाळा नखातेवाडीला आठवडाभर शिक्षकांची दांडी?

किनवट/हिमायतनगर(अनिल मादसवार) नांदेड जिल्ह्यातील किनवट व हिमायतनगर तालुक्याच्या बॉर्डरवर असलेल्या मुळझरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नखातेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांची सलग अनुपस्थिती उघड झाल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी, मंत्रालय मुंबई यांच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत सामाजिक अंकेक्षणासाठी साधन व्यक्ती शंकर बरडे व सुरेश डवरे शाळेत पोहोचले असता शाळेला कुलूप लागलेले आढळले.

ग्रामस्थांकडे चौकशी केली असता, “गेल्या आठ दिवसांपासून शिक्षक शाळेत हजर नाहीत,” अशी धक्कादायक माहिती समोर आली. इयत्ता १ ली ते ४ थीपर्यंत एकूण १२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे सांगण्यात आले; मात्र शाळा बंद असल्याने विद्यार्थी शाळेच्या परिसरातही दिसून आले नाहीत.

साधन व्यक्तींनी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन शिक्षकांच्या उपस्थितीबाबत विचारणा केली असता, “आठ दिवसांत एकदाही शिक्षक आले नाहीत,” अशी माहिती विद्यार्थ्यांकडून मिळाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.

भिसी केंद्रांतर्गत येणाऱ्या या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण दंतुलवाड यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, “इतर शैक्षणिक कामासाठी आदेश काढण्यात आले असल्याने शाळेत उपस्थित राहता आले नाही,” असे उत्तर दिल्याचे समजते. मात्र, विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून इतर कामासाठी आदेश कसा देण्यात आला, याबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

“मी भला, माझा पगार भला” अशा मानसिकतेतून काम करणाऱ्या शिक्षकांमुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. शाळा वेळेवर न उघडणे, उशिरा येणे व लवकर निघून जाणे असे प्रकार सुरू असल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, तसेच तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील आदिवासी भागातील शिक्षणव्यवस्थेकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी सरपंच व ग्रामस्थांनी केली आहे.

शिक्षण हा मूलभूत हक्क असताना आठवडाभर शाळा कुलूपबंद राहणे ही गंभीर बाब असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या या प्रकाराकडे शिक्षण विभागाने गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button