देगलूर l देगलूर तालुक्यात सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या खुशी सेवाभावी संस्थेच्या वतीने देगलूर शहरातील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करून एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना विद्यालयाचे मुख्याध्यापक मारुती शिंदे म्हणाले, “फक्त एका फोन वर बबलू टेकाळे यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे गणवेश उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी संगणक उपलब्ध करून देण्याची विनंतीही मी त्यांना केली आहे.

यामुळे येत्या काही वर्षांत विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी मोठी मदत होईल.” यावेळी बबलू टेकाळे यांनी लवकरच संगणक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दरम्यान कार्यक्रमात खुशी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष एकनाथ शेषराव टेकाळे (ब्बुलू) यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “खुशी सेवाभावी संस्था समाजातील गरजूंसाठी नेहमीच काम करत आली आहे. आज अंध विद्यार्थ्यांना गणवेश देताना आम्हाला आनंद होत आहे. यापुढेही सामाजिक उपक्रम अविरतपणे राबवले जातील.”

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एकनाथ शेषराव (टेकाळे), गजानन टेकाळे (सचिव), संगम बैलके, गंगाधर उल्लेवार, बाबुराव मीनकीकर, उमेश भांगे, संभाजी कोमावार, संजय गवलवाड, साहेबराव पेंडाळे, नागनाथ कुद्रे, शेख असलम, मिलिंद वाघमारे, धनाजी देशमुख, तोहीद काजी, दीपक तलवारे, रियाज अत्तार आदी उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजुरकर आंबुलगेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन एम. बी. गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी संस्थेच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले.