नांदेड| जिल्ह्याच्या मुखेड व देगलूर तालुक्यांसह तेलंगणा राज्याच्या काही भागातील जलसिंचनासाठी वरील प्रकल्पाची निर्मिती होत असून पुनर्वसन, धरण आणि कालवे या तीन प्रकारांतील नियोजित कामांसाठी तेलंगणा राज्याकडून २१८ कोटी रुपये येणे बाकी आहे.

यासाठी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी हैदराबाद येथे तेलंगणा राज्यातील पाटबंधारे व लाभ क्षेत्र खात्याचे सचिव प्रशांत पाटील यांची भेट घेतली त्यानंतर खऱ्या अर्थाने सूत्र हलायला सुरुवात झाली. प्रशांत जीवनराव पाटील पानपट्टे हे मूळचे कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील असल्याकारणाने आपल्या जिल्ह्यासाठी प्रलंबित असलेला लेंडी प्रकल्पसाठी सकारात्मक पावलं उचलण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

खासदार चव्हाण यांनी तेलंगणाचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री विक्रमाबट्टी आणि जलसंपदा मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी सचिव प्रशांत पाटील उपस्थित राहून योग्य ती माहिती देऊन हा प्रकल्प दोन्ही राज्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी कशा फायदेशीर होऊ शकतो यासंबंधी माहिती दिली. वाढपी आपला असेल तर जेवणाचा फायदा होतो या म्हणीला अनुसरूनच तेलंगणा राज्यांमध्ये कार्यरत असलेले सचिव प्रशांत पाटील हे नांदेड जिल्ह्याचे असल्यामुळे निश्चितच लेंडी प्रकल्पाचा प्रलंबित निधी जिल्ह्याला मिळेल ही अपेक्षा जनसामान्यांमध्ये व्यक्त होत आहे.
