नांदेड। बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा,संरक्षक मलकीतसिंग दाखा यांच्या पुढाकाराने 3 सप्टेंबर रोजी नांदेड येथे मिलाप दीन साजरा करण्यात येणार आहे.


1708 मध्ये 3 सप्टेंबर रोजी श्री गुरु गोविंदसिंघ जी महाराज आणि बाबा बंदा सिंघ बहादूर यांची नांदेड येथे भेट झाल्याचा दिवस हा मिलाप दीन म्हणून साजरा केला जातो. हा मिलाप दिन साजरा करण्यासाठी लुधियाना एक जत्था नांदेड येथे येणार आहे. बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष कृष्णकुमार बावा यांनी आज येथे माहिती देताना सांगितले की, दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंग जी महाराज आणि बाबा बंदा सिंग बहादूर (माधो दास बैरागी) यांच्यातील ऐतिहासिक भेट ३ सप्टेंबर रोजी सकाळी सचखंड येथे श्री अखंड पाठ साहिबच्या भोगानंतर साजरी करण्यात येणार आहे.


थाडी जत्थे, रागी, कवीशर, इतिहासकार यावेळी आपले विचार मांडणार आहेत. तख्त श्री हजूर साहिबचे मुख्य जत्थेदार संत बाबा कुलवंत सिंग जी यांना ‘ज्ञान दा सागर श्री गुरु ग्रंथ साहिब’ हा ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. ऐतिहासिक मिलाप दीन साजरा करण्यासाठी ८० जणांचा जत्था के के बावा व दाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सचखंड एक्स्प्रेसने आज ३१ ऑगस्ट रोजी नांदेड येथे पोहचणार आहे. ३ सप्टेंबर रोजी बंदा घाटावर दिवाण सजवून ३१६ वा मिलाप दिन साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बाबा बंदा सिंग बहादूर इंटरनॅशनल फाऊंडेशनचे वतीने केले आहे.




