नायगांव/नांदेड। बळेगाव बाभळी बंधारा बॅकवॉटरमुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आम्ही नायगाव, उमरी, धर्माबाद, बिलोली तालुक्यातील शेतकऱ्याला एकत्र करून लढा उभा करणार आहोत असे रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी आज पाटोदा येथील शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितले.
नांदेड जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी गोदावरी ही पुढे तेलंगणा राज्यांमध्ये वाहत जाते. या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये बळेगाव व बाभळी बंधारा बांधण्यात आलेला आहे. गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने या दोन बंधाऱ्याच्या बॅक वॉटर मुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली येते, त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद मका इ. पिकाचे नुकसान होते. यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे त्याचा आर्थिक कणा मोडलेला आहे.
यावर्षी तर दि.०१ ते ०४ सप्टेंबर पर्यंत संपूर्ण शिवार पाण्याखाली होते त्यामुळे शेतातील असलेले खराब पीक काढून फेकून देण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याकडे दमडी शिल्लक राहिली नाही. दरवर्षी या भागातील शेतकरी प्रशासनाकडे तक्रार करतात तक्रारची दखल घेतली जात नाही आणि तुटपुंजी मदत करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा काम सरकार करत आहे.
नदीपात्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना *यावर्षीचा 100% पीक विमा लागू करावा आणि कायमस्वरूपी उपाय योजना करत विशेष आर्थिक पॅकेज देऊन जमीन अधिग्रहण करून शेतकऱ्याला मावेजा द्यावा या दोन प्रमुख मागण्यासाठी गावोगाव बैठका या लढाईची दिशा ठरवण्यात येणार आहे. यावेळी मनोज हंबर्डे, ज्ञानेश्वर शिंदे, कल्याण तिजोरे, श्रीराम शिंदे, राजेश आलेवाड, दत्ता गोडगेवाड इत्यादी अनेक शेतकरी उपस्थित होते.