हिमायतनगर,अनिल मादसवार| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून दिनांक 23 सप्टेंबर सोमवारी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने हिमायतनगर बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला हिमायतनगर शहर व तालुक्यातील व्यापारी व नागरिकांनी बाजारपेठ कडकडीत बंद ठेऊन मोठा प्रतिसाद दिला आहे. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त करून विविध मागण्याचे निवेदन प्रशासकीय अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठवीण्यात आले आहे.


मागील सात दिवसापासुन मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाच्या न्यायिक मागण्यासाठी आमरण उपोषण करत आहेत. परंतु अद्यापही शासनाने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली नाही. परिणामी त्यांची तब्बेत खालावत चालली आहे. शासनाच्या या आडमुठे धोरणांच्या विरोधात आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून सोमवारी दिनांक 23 सप्टेंबर सकाळ पासून ते सायंकाळ पर्यंत हिमायतनगर शहर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. हिमायतनगर येथे सकल मराठा समाजातर्फे विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. यामध्ये तात्काळ मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दखल घेत मागण्या मान्य कराव्या. जरांगे पाटलांचे उपोषण सोडवून सकल मराठा समाजाला न्याय द्यावा. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी. हैद्राबाद सह सातारा, बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅझेट लागु करावे. अंतरवाली सराटीसह संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हे सरसकट मागे घेण्यांत यावेत.

राज्यभरात कुणबी नोंदणी तपासुन, कुणबी जात प्रमाणपत्र देण्यांचे काम हे अतिशय मंदगतीने चालु आहे. त्याला गती देण्यांचे काम शासकीय यंत्रणमार्फत करण्यांत यावे. ई.डब्ल्यु.एस. सह एस.ई.बी.सी. आणि कुणबी हे तिनही पर्याय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन द्यावेत. 1 जुन 2004 च्या कायद्यात सुधारणा करुन मराठा व कुणबी एकच असल्याचा शासन निर्णय जारी करावा. अश्या मागण्यांचे निवेदन नायब तहसिलर पैलवाड यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पाठविण्यात आले आहे. या निवेदनावर हिमायतनगर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
