नांदेड। नेरली येथे दूषित पाणी पिऊन उद्भवलेल्या दुर्दैवी प्रसंगानंतर जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने तत्परतेने पाऊले उचलली. मात्र, नेरलीच्या या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, यासाठी खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी म्हटले आहे.


नेरली येथील घटनेबाबत प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, घडलेला प्रकार अतिशय गंभीर आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मी प्रशासनाशी संपर्क साधून सद्यस्थिती जाणून घेतली. जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती पावले उचलली आहेत. मात्र, भविष्यात इतरत्र असा प्रकार घडणार नाही, यासाठी योग्य ते खबरदारीचे उपाय प्रशासनाने करावेत, अशी सूचना मी दिली आहे.

