श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे| महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत माहूर तालुक्यातील विविध कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करून लाखों रुपयाचा भ्रस्टाचार केल्या संदर्भात वसराम नाईक तांडा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव यांनी सहायक आयुक्त (पं.)नागपूर यांचेकडे तक्रार केली होती. त्यानुसार सहआयुक्त यांनी दि. १३/१/२०२५ रोजी (पत्र क्र. ११३/२०२५)उपजिल्हाधिकारी (मनरेगा)नांदेड यांना गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, सहायक अभियंता, कंत्राटदार एजन्सी व संबंधित अधिकारी यांचेवर कार्यवाहीचे (Take Action) आदेश दिल्याने प्रचंड खळबळ माजली आहे.

माहूर तालुक्यात मनरेगा कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व भ्रस्टाचार झाल्या संदर्भात वसराम नाईक तांडा येथील जाधव यांनी सहआयुक्त (पं.)नागपूर यांचेकडे रीतसर तक्रार केली होती. सदर तक्रारीचे अनुषंगाने सहायक आयुक्त यांनी माहूर पं. स. चे गटविकास अधिकारी,सहायक अभियंता, कंत्राटदार एजन्सी व संबंधित अधिकारी यांचेवर निलंबनाच्या कार्यवाहीसह मालमत्तेची चौकशी करून फौजदारी दाखल करण्याचे आदेश उप जिल्हाधिकारी(मनरेगा ) नांदेड यांना दिले आहेत.

यापूर्वी देखील मनरेगासह ग्रामपंचायत स्तरावरील अन्य विकास कामात मोठी अनियमितता व प्रचंड स्वरूपाचा भ्रस्टाचार केल्या संदर्भात लेखी स्वरूपात अनेक तक्रारी झाल्या आहेत. काही प्रकरणात चौकशी समितीही नियुक्त करण्यात आली. त्या समितीने प्रत्यक्षस्थळी चौकशीही केली आहे. परंतु अद्याप कुणावरही कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने समितीने केलेली चौकशी म्हणजे केवळ देखावाच असल्याचे जनतेच्या निदर्शनास आले आहे. संजय जाधव यांची तक्रारही त्याच सदरात मोडते की, काय असा समज सर्वत्र पसरलेला आहे.
