नांदेड| जीवनात यशस्वी होण्यासाठी गुणवत्ता जसे महत्त्वाचे असते त्याप्रमाणेच सुखी होण्यासाठी कला व मूल्य शिक्षणाची आवश्यकता आहे. आनंदी आणि नैतिकदृष्ट्या बळकट असणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी शास्त्रीय कंठसंगीत कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील ललित व प्रयोगजीवी कला संकुलाच्या संगीत विभागाच्या वतीने रूसा अंतर्गत दोन दिवसीय शास्त्रीय कंठसंगीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. दि. २६ व २७ सप्टेंबर रोजी मा. सिता राममोहन राव व सूरमणी पंडित श्याम गुंजकर यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर अध्यक्षस्थानी होते. तर व्यवस्थापन परिषद सदस्य मा. नरेंद्र चव्हाण, अंतरविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, शिक्षणशास्त्र संकुलाचे प्रा. डॉ. महेश जोशी व संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक मा. सीता राममोहन राव यांनी विविध रागांचे स्वरूप आणि बंदिशी या विषयाचे सखोल मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी स्व.पं. जसराज, स्व. अण्णासाहेब गुंजकर यांचे शिष्य महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक सुरमणी पं.श्याम गुंजकर यांनी कंठसाधना आणि सौंदर्यात्मक गायकी याविषयी मार्गदर्शन केले. राग पुरिया धनश्री गाऊन मैफल शिखरावर नेली, तराना, ठुमरी आणि सिंध भैरवीने सांगता केली. या कार्यशाळेला एकूण ८० विद्यार्थी उपस्थित होते.
दि. २७ सप्टेंबर रोजी कार्यशाळेचा समारोप संपन्न झाला. समारोप व प्रमाणपत्र वितरण प्रसंगी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. चंद्रकांत बाविस्कर, संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिवराज शिंदे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी कार्यशाळेचे संयोजक डॉ. शिवराज शिंदे, प्रा. किरण सावंत, प्रा. नामदेव बोंपीलवार, प्रा. प्रशांत बोंपीलवार व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.