नांदेड| श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जयंतीस समर्पित ’51 वीं अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल आणी सिल्वर कप हॉकी टूर्नामेंट’ स्पर्धेत शनिवारी खेळण्यात आलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आर्मी इलेवन जालंधर, बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (बीएसएफ) जालंधर, साईं एक्सेलेंसी संभाजीनगर आणी ऑडिटर जनरल (ए.जी.) नागपुर संघांनी आपल्या प्रतिस्पर्धीवर मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. रविवारी उपांत्य फेरीचे सामने रंगणार असून, आर्मी इलेवन जालंधर विरुद्ध बीएसएफ जालंधर यांच्यात दुपारी 1 वाजता उपांत्य फेरीचा पहिला सामना खेळला जाईल. तर दूसरा सामना दुपारी 3 वाजता साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध ए. जी. नागपुर संघाचा सामना होईल.
आज उपांत्य पूर्व फेरी अंतर्गत पहिला सामना सकाळी 9 वाजता आर्मी इलेवन जालंधर विरुद्ध कस्टम मुंबई संघात खेळला गेला. आर्मी इलेवन संघाने हा सामना एकतर्फा ठरवत कस्टम मुंबई संघाचा 4 विरुद्ध 0 गोल अंतराने पराभव केला. आर्मी संघाचा कर्णधार मनीष राजबहार याने खेळाच्या दुसऱ्याच मिनिटाला मैदानी गोल करून आघाडी घेतली. त्यानंतर खेळाच्या 44 मिनिटाला प्रदीपसिंघ भीश्त, 54 व्या मिनिटाला आलीशान मोहम्मद यांनी मैदानी गोल केले. खेळाच्या शेवटच्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर मध्ये मानिंदरसिंघ याने गोल करून संघास विजयात आणखीन भर घातली.
आज खेळलेला दूसरा सामना अतिटतिचा झाला असून बॉर्डर सिक्योरटी फोर्स (बीएसएफ) जालंधर संघाने संघर्षपूर्ण सामन्यात ऑरेंज सीटी नागपुर संघाचा 3 विरुद्ध 2 गोल अंतराने पराभव केला. सुरुवातीला दोन्ही संघांनी 2 विरुद्ध 2 गोल करत बरोबरी साधली होती. म्हणून ट्राय ब्रेकरच्या माध्यमातून पाच – पाच गोल करण्याची संधी देण्यात आली. यात बीएसएफ जालंधरने विजय संपादित केला आणी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला.
आजचा तीसरा सामना साईं एक्सेलेंसी संभाजीनगर विरुद्ध यूनियन बँक मुंबई यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांनी उपांत्य फेरी गाठण्यासाठी उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन केले. पण शेवटी साईं एक्सेलेंसी संभाजीनगर संघाने 2 विरुद्ध 1 गोल अंतराने विजय संपादित करत उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. खेळाच्या पहिल्यांच मिनिटाला साई एक्सेलेंसी संघाच्या विशाल मानन्दे याने मैदानी गोल करत आघाडी मिळवून दिली. यूनियन बँक संघाने पलटवार करत तिसऱ्या मिनिटाला बोरोबरी साधली. नवीन खैरातकर याने पेनल्टी कॉर्नर मध्ये हा गोल केला. खेळाच्या 20 व्या मिनिटाला साईं संघाच्या हर्षदीपसिंघ कपूर याने पेनल्टी स्ट्रोक मध्ये गोल नोंदवला. नंतर कोणत्याही संघास गोल करता आले नाही. आणी साई एक्सेलेंसी उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला.
आजचा शेवटचा उपांत्य पूर्व सामना ऑडिटर जनरल (ए. जी.) नागपुर आणी एस. जी. पी. सी. अमृतसर संघात खेळला गेला. नागपुर संघाने उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन करीत 3 विरुद्ध 0 गोल अंतराने विजय मिळवला. नागपुर तर्फे तिरसकुमार याने 6 व्या मिनिटास, प्रमोद याने 23 व्या मिनिटास आणी आमीद खान पठान याने 56 व्या मिनिटाला गोल करत खेळात वर्चस्व सिद्ध केले. तसेच उपांत्य फेरीत स्थान मिळवले. अमृतसर संघास महत्वाच्या सामन्यात गोल करता आले नाही. आजच्या विविध सामन्यात राजकुमार झा, आश्विनी कुमार, रतिन्दरसिंघ, गुरमीत सिंघ, सिद्धार्थ गौर, गुरतेजसिंघ, राहूल राज, महेश कुमार यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली.