नांदेड। लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत. माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजप सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादि काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता पाटील यांच्यासोबतचे जुने सहकारी तथा माजी गृहराज्यमंत्री डॉ. माधवराव किन्हाळकर यांनी भाजपाला सोडचिट्टी दिली आहे. आपल्या सर्व पदांसह भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठविला आहे.


नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार खा. वसंतराव चव्हाण यांनी भाजप उमेदवार माजी खा. प्रताप पाटील चिखलीकर यांचा दारूण पराभव केला. यानंतर नांदेड जिल्ह्यात भाजपामध्ये चलबिचल सुरू झाली आहे. वेगवेगळ्या नेत्यांच्या गटाकडून आरोप, प्रत्यारोप सुरू होऊन अस्थिरतेचे बातावरण निर्माण झाले आणि यातून भाजपच्या जेष्ठ नेत्या माजी केंद्रीय मंत्री सुर्यकांता पाटील यांनी भाजपला रामराम केला. तत्पूर्वी पाटील यांनी भारतीय जनता पक्षाने हिंगोली आणि वाशिम लोकसभा मतदारसंघात दिलेले उमेदवार चुकीचे होती. मुख्यमंत्र्यांच्या हट्टापायी हा निर्णय घेण्यात आला, तो चुकीचा ठरला. त्यात पक्षाचे नुकसान झाले हिंगोलीची जागा तर मलाच मिळायला हवी होती अशी प्रतिक्रिया व्यक्त करीत माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आपला भाजप पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.


या राजीनामा पत्रात त्यांनी गेल्या दहा वर्षात पक्षाने आपल्याला जी संधी दिली, त्याबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्वाचे धन्यवाद व्यक्त केले. तर भाजपात दहा वर्षाची मी शिक्षा भोगली, आता चांडळ चौकडीपासून माझी सुटका झाली आहे. अशी जहरी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर अवध्या दोन दिवसात मुंबई येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. या घडामोडीनंतर अन्य काही नेते भाजप सोडतील असे बोलले जात होते. ते आता खरे ठरत असून भाजप नेते माजी गृहराज्य मंत्री डॉ. माधव किन्हाळकर यांनी भाजपला रामराम केला मी पाटील यांच्यासोबत तेव्हाच गेलो असतो असे डॉ. किन्हाळकर यांनी म्हंटले आहे.



माध्यमांशी बोलताना डॉ किन्हाळकर म्हणाले की, गेली दहा वर्ष भाजपमध्ये काम केले. या काळात पक्षाचे विचार आणि कृतीमध्ये मोठे आंतर जाणवला. आपली महत्वकांक्षा, विशिष्ट हेतू व लोकांची कामे व्हावीत यासाठी आपण भाजपात गेलो होते. पण वेगळेच अनुभव आले. देशात सामाजिक, आर्थीक विषमता वाढली. याचा फटका भाजपला बसला. पक्षाच्या कृतीमध्ये काही सुधारणा होईल असे वाटत होते, ती अपेक्षा फोल ठरली. यामुळेच भाजपला सोडले असे डॉ. माधव किन्हाळकर यांनी सांगतीले. तर माजी केंद्रीयमंत्री सुर्यकांता पाटील यांच्यासोबत मला जायचे तर तेव्हाच गेलो असतो. असे सांगत येत्या आठ दिवसात कोणत्या पक्षात जायचे याबाबत निर्णय घेऊ असे ते म्हणाले.

डॉ. माधवराव किन्हाळकर हे सुर्यकांता पाटील यांचे जुने सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी दि. ९ जुलै रोजी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पक्षातील सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्याचा राजीनामा सादर केला आहे. यामुळे नदिड भाजपला दुसरा धक्का बसला आहे. दहा वर्षांपूर्वी माधवराव पाटील किन्हाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्यातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु किन्हाळकर यांना या काळात भाजपने कुठलीही जबाबदारी दिली नाही. आता ते पुन्हा राष्ट्रवादी शरद पवार गटात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या राजीनाम्याने लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला लागलेली गळती सुरूच असल्याचे दिसून येत आहे. यापुढे आणखी कोणकोणते पदाधिकारी राजीनामा देतील याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.


