नांदेड| वज्रमुठ राज्यव्यापी बैठक ता. 27 सांगवी येथे तीव्र रोषाच्या वातावरणात पार पडली. विविध मराठा संघटना, शेतकरी नेते, आणि पुरोगामी विचारधारेचे कार्यकर्ते एकत्र येत सरकारविरोधात कठोर भूमिका घेताना दिसले. बैठकीत झालेल्या निर्णयानुसार, मराठा समाजावर झालेल्या अन्यायाची ‘जशास तसे’ चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा देण्यात आला.


पुरोगामी कार्यकर्ते प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याला उपस्थितांनी मराठा समाजावरील थेट हल्ला मानले. “हा हल्ला म्हणजे मराठ्यांनी औकातीत राहावं हा इशारा,” अशा शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या, जरांगे पाटलांच्या आंदोलनावरील लाठीमार,इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ,आणि छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांचा अवमान या सर्व घटनांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.


याच बैठकीत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विजयकुमार घाडगे पाटलांवर झालेल्या मारहाणीवरूनही संताप व्यक्त करण्यात आला. बैठकीत सांगितलं की, उपमुख्यमंत्री “अजितदादा पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना लगाम घालावा, नाहीतर परिणाम भोगावे लागतील.” छावा संघटनेचे कार्यकर्ते खासदार सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेवेळी केलेल्या शांततापूर्ण प्रतीकात्मक आंदोलना नंतर त्यांच्यावर झालेली मारहाण लोकशाहीविरोधी असल्याचा ठपका बैठकीतून ठेवण्यात आला.



मराठा तरुणांच्या आवाजावर गदा आणणाऱ्या घटनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “कृषीमंत्री सभागृहात रमी खेळू शकतात, पण गरीब तरुण आवाज उठवतो तेव्हा त्याला मारहाण होते. ही कोणती मर्दानगी?” असा सवाल उपस्थित केला गेला. याचंवेळी काही मागण्या करण्यात आल्या ज्यामध्ये प्रामुख्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा,हल्लेखोरांवर कठोर कारवाई,मराठा समाजावरील होत असलेला अन्याय थांबवणे,आदी होत्या यावेळी तीस पेक्षा जास्त अधिक संघटनेचे पदाधिकारी व महिला यावेळेस होते. दरम्यान ही लढाई शेवटपर्यंत लढली जाईल, आणि अन्याय थांबल्याशिवाय थांबवली जाणार नाही,असा ठाम निर्धार या बैठकीतून व्यक्त झाला.



