हिमायतनगर,अनिल मादसवार। शेतातील कापूस विकून आलेली रक्कम जमा करण्यासाठी भारतीय स्टेट बैंकेत येऊन कैश काउंटरच्या लाईनला उभे असलेल्या एका शेतकऱ्याच्या थैलीतून कोण्यातरी अज्ञात महिला व पुरुष चोरट्यानी एक लक्ष रुपयाची रक्कम लंपास केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून, वारंवार हिमायतनगर येथील एसबीआय बैंकेतून अश्या प्रकारे रक्कम चोरी होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी सुरक्षा गार्ड नेमण्यात आल्यानंतर देखील बैंकेतून चोरी झाल्याने ग्राहक वर्गातून आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/12/Vardhaman-2.png)
याबाबत सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाराळी तांडा येथे वास्तव्य करणारा शेतकरी गणपत लखू जाधव या शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामातील काढणीला आलेल्या कापसाची वेचणी केली. आणि कापसाचे भाव वाढत नसल्याने अखेर ०३ डिसेंबरला घरातील कापसाची विक्री व्यापाऱ्याकडे केली होती. आज कापसाची रक्कम व्यापाऱ्याकडून मिळाल्यानंतर त्यापैकी एक लक्ष रुपयाची रक्कम भारतीय स्टेट बँकेमध्ये रक्कम डिपॉझिट करण्यासाठी दिनांक ११ रोज बुधवारी घेऊन आला होता. बुधवार आठवडी बाजार आणि रब्बी हंगाम सुरु असल्याने हिमायतनगर येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या बैंकेत गर्दी होत असल्यामुळे शेतकरी बैंकेच्या लाईनमध्ये रक्कम भरण्यासाठी उभा होता.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/06/Chidrawar-10x20-News.jpg)
रक्कम भरण्याचा नंबर आल्यानंतर कैश काउंटर खिडकी जवळ शेतकऱ्याने कैशियरला डिपॉजिट स्लिप देऊन नायलॉनच्या थैलीतून रक्कम काढण्यासाठी हात टाकला. यावेळी थैलीतील एक लक्ष रुपये गायब झाल्याचे शेतकयांच्या लक्षात आले. यावरून पाठीमागे लाईनमध्ये उभे असलेल्या अज्ञात चोराने शेतकऱ्यांच्या थैलीतून रक्कम अलगदपणे काढून चोरून नेले असतील असा संशय आल्याने शेतकऱ्यांनी तात्काळ बैंकेच्या शाखाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांना रक्कम चोरीला गेल्याची माहिती दिली.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2024/07/saai-1.jpg)
शाखाधिकारी यांनी लागलीच हिमायतनगर येथील पोलिसांना बोलावून त्यांच्या उपस्थितीत कैश काउंटर लाईनच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी पाठीमागे उभे असलेली एक महिला आणि पुरुषाने संगनमताने शेतकऱ्याची रक्कम लंपास केल्याचे दिसून आले. हा सर्व प्रकार भारतीय स्टेट बैंकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या संदर्भात शेतकऱ्याने पोलिसांना तक्रार दिली आहे. यावरून हिमायतनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसबीआय मध्ये घडलेल्या चोरीच्या घटनेचा पूढील तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी जमादार कोमल कागणे आणि हेडकोन्स्टेबल नागरगोजे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीने चोरट्यांच्या शोधात पाठविले आहे.
![](https://nnlmarathi.com/wp-content/uploads/2025/01/IMG-20250103-WA0006.jpg)
मागील दोन वर्षांपूर्वी हिमायतनगर येथील भारतीय स्टेट बैंकेतून एका व्यापाऱ्यांची आणि एका शिक्षकाची मोठी रक्कम चोरीला गेली होती. गतवर्षी एका मायक्रो फायनानांस कंपनीच्या सुपरवायजरच्या बैगेतून रक्कम चोरीला गेली होती. त्या घटनेचा तपास जैसे थेच असताना पुन्हा यावर्षी रब्बी हंगामाच्या काळात शेतकऱ्याची रक्कम चोरीला गेली आहे. सीसीटीव्ही कैमेऱ्यात आरोपी दिसत असताना चोरट्याचा शोध पोलिसांना लावता आला नाही. त्यामुळे बैंकेत रक्कम काढण्यासाठी गेलेल्या नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. अगोदरच अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या रक्कमेवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात आला असल्याचे दिसून येत आहे.