हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरातील गजबजलेल्या लकडोबा चौक वस्तीत असलेल्या हनुमान मंदिरातून अज्ञात चोरट्याने पावसाच्या सरी आणि शांततेचा फायदा घेऊन अंदाजे ७० हजार रुपये किमतीचा अहुजा कंपनीचा ऍम्प्लिफायर चोरून नेला आहे. ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून, चोरटा अंगावर भगवी दस्ती खांद्यावर टाकून एम्प्लिफायर घेऊन जात असल्याचे दिसत असल्याने पोलीस या दिशेने तपास सुरु केला आहे. हिमायतनगर शहरात चोरीच्या घटना घडत असताना यावर अंकुश लावण्यात पोलिसांना अपयश आले असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.



गेल्या आठ दिवसापासून हिमायतनगर शहरात पावसाची संतधर सुरु आहे, या संधीचा फायदा घेत हिमायतनगर शहर व परिसरात चोरटे सक्रिय झाले आहेत. पावसाची रिपरिप चालू असल्याने नागरिकांची वर्दळ कमी असल्याची संधी साधून अज्ञात चोरटे दुकान फोडणे, घरफोडी करणे, मंदिरातून व इतर ठिकाणाहून साहित्य चोरून येणे आदि छोट्या-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत. या घटना मधील एका चोरीचा पोलिसांनी नुकताच पर्दाफाश केला असताना दुसऱ्या दिवशी आणखी एक चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. तर रविवार दिनांक २८ रोजी देखील सायंकाळी सात वाजेच्या सुमारास लकडोबा चौकातील हनुमान मंदिरात चोरीची घटना घडली आहे.



मंदिर परिसरात कोणीच नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने प्रथमतः मंदिरात प्रवेश केला. सुरुवातील त्याने हनुमंतरायचे दर्शन घेऊन बाजूलाच असलेल्या साउंड सिस्टीमचे प्लग काढून अंदाजे ७० हजार रुपये किमतीचा ऍम्प्लिफायर चोरून नेला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाला असून, याची तक्रार पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आणि सीसीटीव्हीमध्ये चोरट्याचा चेहरा कैद झाला असून, तो अंगावर भगवी दस्ती टाकून मंदिरात येऊन परत डाव्या हातात इम्प्लिफायर घेऊन जात असल्याचे दिसत आहे. असे असले तरी त्याचा चेहरा ओळखायला येत नसल्याने त्या अज्ञात चोरट्याचा माग काढण्यास पोलिसांनी यास मिळेल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. एकूणच हिमायतनगर शहरात घडत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, हिमायतनगर शहरात पोलिसांनी रात्रगस्त वाढऊन होऊ लागलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी मागणी सुजाण नागरिक व भाविक भक्तातून केली जात आहे.



यासंदर्भात लकडोबा चौक मंदिराचे अध्यक्ष तुकाराम मेरगेवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, काल सायंकाळपर्यंत आम्ही मंदिरात बसून होतो आम्ही घराकडे गेल्यानंतर मंदिराचा वोचमन देखील जेवायला घरी गेला. हीच संधी साधून चोरट्याने हा प्रकार केला आहे, नुकतेच आम्ही ७० हजाराच्या खर्चातून नवीन एम्प्लिफायर खरेदी केला होता. आणि रविवारी रात्र होण्यापूर्वी चोरीला गेल्यामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाले असून, पोलिसांनी या चोरट्याचा शोध लावून मंदिराचे साहित्य परत मिळवून द्यावे अशी मागणी त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.




