श्रीमती सविता सिदगोंडा बिरगे मॅडम यांचा जीवनप्रवास जिद्द, संघर्ष आणि यशाची एक अद्वितीय कहाणी सांगणारा आहे. प्रतिकूल परिस्थितीतून उभ्या राहून त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला आहे. शिक्षिकेच्या भूमिकेतून शिक्षणाधिकारी पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा समाजासाठी दीपस्तंभाचा आदर्श ठरतो.
1987 साली दहावी आणि 1989 साली D.Ed. पूर्ण करून त्यांनी खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. 1992 मध्ये जिल्हा परिषद हायस्कूल बारड येथे शिक्षिका म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. खाजगी शाळेत उत्कृष्ट कामगिरीनंतर जिल्हा परिषदेत नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्यातील विद्यार्थी जिवंत ठेवत शिक्षण सुरूच ठेवले. 1998 साली बी.एड., 2005 साली एम.ए. (मराठी), 2006 साली एम.एड., 2013 साली सेट परीक्षा आणि 2022 साली पीएच.डी. हे उच्च शिक्षण पूर्ण केले. हे दर्शवते की त्या केवळ एक प्रेरणादायी शिक्षिका नव्हत्या, तर शिक्षणाच्या ध्यासाने झपाटलेल्या विद्यार्थीनीही होत्या.
21 वर्षांच्या सेवेत त्यांचे अनेक विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश मिळवलेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये यशस्वीपणे कार्यरत आहेत. त्यांनी फक्त विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले नाही, तर एका मार्गदर्शकाच्या भूमिकेतून त्यांना प्रेरणा दिली. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी एमपीएससी सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण केली आणि 2013 साली शिक्षणाधिकारी (निरंतर) वर्ग 1 म्हणून जिल्हा परिषद नांदेड येथे नियुक्ती मिळवली व तदनंतर डिसेंबर 2021 पासून नांदेड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून आजतागायत कार्यरत आहेत.
शिक्षणाधिकारी पदावरून त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा करण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. या कार्यकाळात शिक्षकांच्या पदोन्नत्या, 24 वर्षापासून प्रलंबित असलेली निवड श्रेणी मंजुरी तसेच ऑनलाइन वेतन प्रणाली लागू करणारा नांदेड जिल्हा हा राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा ठरला आणि पेंशनधारकांना लाभ मिळवून देणे यासारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांची अंमलबजावणी त्यांनी केली. पती आणि कुटुंबियांच्या सहकार्यामुळे, त्यांनी कुटुंब आणि कार्यालयीन कामकाजात योग्य समन्वय साधला आहे. त्यांच्या दोन मुली आणि एक मुलगा हे सर्वजण उच्च शिक्षण घेऊन यशस्वीपणे इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.
त्यांचा जीवनप्रवास महिलांसाठी आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे. शिक्षण, कुटुंब आणि समाजकार्य या तिन्ही गोष्टींचा योग्य समतोल राखत त्यांनी महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षण व्यवस्थेत नांदेड जिल्ह्यात सकारात्मक बदल घडले आहेत. श्रीमती बिरगे मॅडम यांच्या वाढदिवसानिमित्त, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिप्परगाथडी केंद्र केसराळी येथे ग्रामपंचायतीच्या प्रांगणात वटवृक्षारोपण करण्यात आले. या वटवृक्षाच्या माध्यमातून त्यांना दीर्घायुष्य, आरोग्य, आणि यश लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली. या निमित्ताने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी पर्यावरणप्रेमी शिक्षक बालाजी गेंदेवाड सर, सूर्यकांत गायकवाड सर, अजय कोंडलवाडे सर, शंकर नाईक सर, संजय गायकवाड सर, रामदास संगेवार सर, गौस सर, शामला देशपांडे मॅडम आणि शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. श्रीमती सविताजी बिरगे मॅडम यांचा जीवनप्रवास संघर्षातून उभारी घेतलेल्या यशाची प्रेरणादायी कहाणी आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्यामुळे आज अनेकांना नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी, यशासाठी आणि तसेच वाढदिवसाच्या निमित्ताने मनःपूर्वक लक्ष लक्ष शुभेच्छा…
शब्दांकन- बालाजी ल. गेंदेवाड रावणगावकर बिलोली.