हिमायतनगर, दत्ता शिराणे| राज्यात विधानसभेच्या निवडणूका पार पडल्या. जवळपास एक ते दिड महिना संपुष्टात येत असून, आता विधनासभा निवडणुकीनंतर स्थानिक पुढाऱ्यांचे लक्ष आता जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे लक्ष (leaders focus on local self-government elections) लागले आहे. हिमायतनगर नगरपंचायत चा कालावधी तर २५ जानेवारी २०२१ ला संपलेला आहे. २६ जानेवारी २०२१ पासून हिमायतनगर ची नगरपंचायत प्रशासकाच्या ताब्यात आहे. जवळपास एका निवडणुकीचा पंचवार्षिक काळ संपुष्टात येत असला तरी आणखीन निवडणूका लागल्या नसल्याने इच्छूकात मात्र मोठी नाराजी पसरलेली पहावयास मिळत आहे.

२०२४ हे वर्ष निवडणुकांचे वर्ष राहीले आहे. याच २०२४ ला लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या आहेत. केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात भाजपने सत्ता प्रस्थापित केली. परंतू या वेळेस भाजपला बाहेरून पाठींबा घ्यावा लागला. त्यानंतर २० नोव्हेंबर ला विधान सभेच्या निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महायुतीची एक हाती सत्ता राज्यात प्रस्थापित झाली.

भाजपने शिंदे सेना व अजित पवारांच्या राष्ट्रवादी ला सोबत घेऊन घवघवीत यश संपादन केले. विधान सभा व लोकसभा ह्या निवडणूका नेत्यांच्या निवडणूका होत्या. परंतू जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका ह्या कार्यकर्त्याच्या असतात. आणी या निवडणुकीला मात्र अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निवडणूका रखडलेल्या असतानाच ,नगरपंचायत चा कालावधी मात्र चार वर्षाहून अधिक काळ संपलेला आहे.

दि. २५ जानेवारी २०२१ ला हिमायतनगर नगर पंचायत चा कालावधी संपला होता. देश्यात व राज्यात कोरोणा संसर्गजन्य महामारीचा प्रकोप आला. परिणामी नाईलाजास्तव निवडणूक आयोगाला या ठिकाणच्या निवडणूका घेणे जमलेले नाही. आता कोरोणा गेला आणी लोकसभा आणी विधान सभा ही पार पडल्या. आता राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीसह नगरपंचायत च्या निवडणूका होणे अतिशय गरजेचे असून, राज्य शासनासह, निवडणूक विभागाने रखडलेल्या निवडणूका घेण्या करीता तातडीने पाऊले उचलावीत. अशी मागणी आता सर्व सामान्य कार्यकर्त्यांतून केली जात आहे.
