हिमायतनगर, अनिल मादसवार| नुकत्याच झालेल्या सत्ता परिवर्तनानंतर हिमायतनगर शहरातील चौका चौकात कचऱ्याचे ढिगारे साचल्याने आणि गटार नालीचे पाणी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नेमलेल्या सब गुत्तेदाराने कचरा उचलण्यास नकार दिल्याने शहरात हि परिस्थिती उद्भवली. याकडे नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष केल्याने पाच दिवसापासून ठिकठिकाणी कचरा जमा होऊन सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. काही जागरूक नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार महोदयांच्या निदर्शनास हि बाब आणून देत नगरपंचायतीच्या भोंगळ कारभाराचे पितळे उघडे पाडले आहे. नागरिकांच्या समस्येची दखल घेत आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी तात्काळ कचरा उचलण्याची व्यवस्था करा अश्या सूचना नगरपंचायतीचे कार्यालय अधीक्षक श्री महाजन यांना केल्या आहेत.

विधानसभा निवडणूक होऊन सत्ता बदल झाल्याने शहरात स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या ठेकेदाराने घनकचरा उचलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे हिमायतनगर शहराच्या स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून, जिकडे तिकडे नाल्या तुंबल्या. तर मंदिर तसेच शहरातील मुख्य चौका चौकात कचऱ्याचे साम्राज्य पसरून दुर्गंधीयुक्त वातावरण निर्माण झाल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे. खरे पाहता नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणेने ठेकेदाराने कचरा उचलण्यास नकार दिल्यानंतर तात्काळ आपली यंत्रणा राबवून उपाययोजना करून नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे क्रमप्राप्त होते. नगरपंचायतीला स्वतःच्या १० ते १५ घंटागाड्या आहेत. नाल्याची सफाई, कचरा उचलण्यासाठी नगरपंचायत दर महिन्याला लाखो रुपये खर्च करते. मात्र नाल्याची सफाई व कचरा उचलण्याचे काम पाच दिवसापासून नियमित केली जात नाही. नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी, कार्यालयातील संबंधित स्वच्छता निरीक्षक व देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्याचा नाकर्तेपणा यास कारणीभूत असल्याचा आरोप जनतेतून केला जात आहे.

कुंभकर्णी झोपेतील नगरपंचायत प्रशासनाच्या स्वच्छता विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने गटारीचे पाणी नाल्यात साचून राहिल्याने परिसरातील नागरिकांच्या घरात घाण पाण्यात उत्पन्न झालेल्या आळ्या शिरत आहेत. यामुळे नागरिक अक्षरशा वैतागले असून, भर हिवाळ्यात डेंग्यू, चिकनगुनिया, डायरिया, ताप, सर्दी खोखला आदींसह पुन्हा कोरोना सारख्या आजाराची लागण होऊन रोगराई पसरत घराघरात रुग्ण वाढण्याची भीती नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. हा प्रकार नगरपंचायतीच्या संबंधितांच्या डोळ्यांना दिसत नाही का..? असा सवाल डासांची उत्पत्ती आणि पसरलेल्या दुर्गंधीने हैराण झालेल्या नागरीकातून उपस्थित केला जात आहे. ज्या प्रकारे कर वसुलीत नगरपंचायत पुढाकार घेते तसाच पुढाकार जनतेला सुरक्षित आरोग्याची हमी देण्यासाठी का..? घेतला जात नाही असा सवाल दुर्गंधी, अस्वच्छतेला वैतागलेले नागरिक विचारीत आहेत.

हिमायतनगर नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमावा
मागील चार वर्षांपासून हिमायतनगर शहराच्या नगरपंचायतीचा कारभार येथील नायब तहसीलदार ताडेवाड यांच्याकडे प्रभारी म्हणून आहे. ते महिनो महिने नगरपंचायत कार्यालयात येत नाहीत. त्यामुळे शहराच्या प्रमुख ज्यात गरजा स्वच्छता, पिण्याचे पाणी, रस्त्यातील खड्डे, सार्वजनिक खांबावरील वीज पुरवठ्यासह अन्य नागरी समस्या वाढतच आहेत. यामुळे जनतेला विविध अडचणीचा सामना करावा लागत असून, ही बाब लक्षात घेता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिमायतनगर नगरपंचायतच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष देऊन शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी नेमून दिलासा देण्यासाठी ठोस पाउले उचलावी अशी मागणी केली जात आहे.
तात्काळ कचरा उचलल्याची व्यवस्था करा – आमदार बाबुराव कोहळीकर
निवडणूक झाल्यापासून ठेकेदारने शहरातील कचरा उचलणे बंद केल्याचे समाजताच काही जागरूक नागरिकांनी नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याकडे तक्रार केली. याची गांभीर्याने दखल घेत आमदार महोदयांनी कार्यालय अधीक्षक श्री महाजन यांच्याशी दूरधवनीवरून संपर्क साधून गावकऱ्यांना घाणीचा त्रास होणार नाही याची काळजी घ्या. तात्काळ जमा झालेला कचरा उचलन्याची व्यवस्था करा अश्या सक्त सूचना केल्या. तुंबलेल्या नाल्याची सफाई करून शहरात साथीचे आजार पसरणार नाहीत यावर जनतेने लक्ष देण्याचे सांगितले. तसेच स्वच्छतेचा ठेका कोणाकडे होता… त्यांची मुदत संपली का..? त्यानंतर नगरपंचायतीने याबाबत उपायोजना का..? केल्या नाहीत याचा जाब विचारला. तसेच तत्काळ यासाठी टेंडर काढून शहरातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न उद्धबवणार नाही यावर तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना आमदार कोहळीकर यांनी दिल्या.
