Active participation of citizens is necessary for village cleanliness नांदेड| ग्रामीण भागातील स्वच्छता अभियानाला अधिक गती देण्यासाठी केंद्र शासनातर्फे देशभरात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2025 सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गाव पातळीवर स्वच्छतेविषयक कामांची पाहणी करण्यात येणार असून, त्याचबरोबर नागरिकांचे अभिप्रायही जाणून घेण्यात येणार आहेत. यासाठी SBMSSG2025 हे ॲप विकसित करण्यात आले आहे. नागरिकांनी गुगल प्ले स्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून त्यामधील प्रश्नावलीला उत्तरे द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी केले आहे.


SBMSSG2025 ॲपचा वापर करताना सर्वप्रथम मोबाईल क्रमांक नोंदवावा लागतो. त्यानंतर आलेला ओटीपी टाकून, भाषेची निवड करून सहभाग नोंदवता येतो. ॲपमध्ये सर्वेक्षणाची माहिती वाचून सर्वेक्षण सुरू करा या पर्यायावर क्लिक केल्यावर राज्य, जिल्हा, लिंग व वय यासह इतर माहिती भरल्यानंतर एकूण १३ प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. ही प्रश्नावली गावातील शौचालय सुविधा, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या स्वच्छता विषयक मुद्द्यांशी संबंधित आहे.

नागरिकांनी दिलेले सकारात्मक अभिप्राय गावाच्या स्वच्छतेच्या दर्जावर थेट परिणाम करणारे आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावातील विविध समिती सदस्य, उद्योजक, महिला बचत गट, युवक-युवती, महिला मंडळे व स्वयंसेवी संस्था यांनी हे ॲप डाऊनलोड करून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या ॲपचा QR कोडही उपलब्ध करून देण्यात आलेला असून, त्याद्वारेही थेट डाऊनलोड करता येते.


या उपक्रमासाठी गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य, व जिल्हा परिषदेतील विभागप्रमुख यांनी योग्य नियोजन करून अधिकाधिक नागरिकांचे अभिप्राय ॲपव्दारे संकलित करावेत. स्वच्छ सर्वेक्षण 2025 या देशव्यापी उपक्रमात नांदेड जिल्हा अग्रणी ठरावा यासाठी सर्वांनी आपला मोलाचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ, व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांनी केले आहे.


1000 गुणांच्या आधारे होणार मूल्यांकन
गाव पातळीवर केंद्रीय समिती प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छता सर्वेक्षण करणार आहे. एकूण 1000 गुणांची मूल्यांकन पद्धती निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनसाठी120 गुण, ग्रामस्थांचा प्रतिसाद व मानसिकतेतील बदलसाठी 100 गुण, स्वच्छता सुविधांचा वापर 240 गुण व प्रत्यक्ष निरीक्षण व गाव स्तरावर भरावयाच्या प्रश्नावलीसाठी 540 गुण असे एकूण 1000 गुणाचे मूल्यांकन असेल.