उस्माननगर, माणिक भिसे| स्टंटबाजी करत दारूच्या नशेत तरुण आपल्या घराच्या पत्र्यावर चढला. मात्र तोल जाऊन जमिनीवर आपटून गंभीर जखमी झाला. ही घटना १३ जून रोजी सायंकाळी डोलारा, ता. लोहा येथे घडली. नातेवाइकाने जखमी तरुणास नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र १४ जून रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.


मिथुन दादाराव वाघमारे (२३) रा. डोलारा असे मयत तरुणाचे नाव आहे. मिथुन हा मजुरीने काम करणारा अविवाहित तरुण होता. मात्र मिथुनला दारूचे व्यसन होते. १३ जून रोजी सायंकाळी हा मिथुन दारूच्या तर्र नशेत आपल्या घरी बडबडत आला व चक्क पत्र्याच्या घरावर चढला. स्टंटबाजी करत असताना त्याचा अचानक तोल गेला अन् वरून कोसळला. यात तो गंभीर जखमी झाला.

त्याच्या आई वडील व नातेवाइकांनी उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली असल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डोलारा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.
