नांदेड| कलांगण प्रतिष्ठाण, श्री स्वामी समर्थ मंदिर अन्नछत्र यांच्या संयुक्त सहकार्यातून काल राज्यातील व शहरातील दिग्गज कलावंतांनी आषाढी एकादशीनिमित्त एकापेक्षा एक सरस भक्तीगिते सादर करुन विठ्ठल भक्तीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रख्यात गझलकार बापू दासरी यांनी केले.


आषाढी एकादशीचे निमित्त साधून कलांगण प्रतिष्ठाण, श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्र यांच्या सहकार्यातून कुसूम सभागृहात अॅड.गजानन पिंपरखेडे यांच्या संकल्पना, निर्मिती व निवेदनातून गजर हरिनामाचा हा कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमात पुण्याच्या चैतन्य कुलकर्णीने, मुंबईच्या आसावरी जोशी (बोधनकर) या प्रख्यात गायकांनी दर्जेदार रचना सादर करुन रसिकांना विठ्ठल भक्तीत मंत्रमुग्ध केले. सोबतच मराठवाड्याचा प्रख्यात गायक विलास गारोळे, गायिका सौ.रागिनी जोशी, उमेश मेगदे आणि विजय जोशी यांनी देखील जुन्या व दुर्मिळ विठ्ठल भक्तीच्या रचना सादर करुन कार्यक्रमात रंगत आणली.


या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते झाले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस अधीक्षक अबिनाशकुमार हे होते. तर प्रजावाणीचे संपादक शंतनू डोईफोड, र्हदयरोग तज्ज्ञ डॉ.राहुल पटणे, उपप्राचार्य प्रा.प्रभाकर उदगीरे, श्रीराम मंदिरचे अध्यक्ष रमेश मिरजकर, प्रसिध्द उद्योजक अनिल शेटकार, धनमुद्राचे बालाजी पांडागळे, राजेंद्र हुरणे आदींची यावेळी उपस्थिती होती.



विठ्ठलाचा महिमा आणि त्याची महती सांगताना अॅड.गजानन पिंपरखेडे यांनी ऐतिहासिक संदर्भ व धार्मिक संदर्भाचा उल्लेख करुन आपल्या आगळ्यावेगळ्या निवेदनाची छाप पाडली. या सर्व गायक कलावंतांनी विठूचा गजर हरिनाम, सुंदर ते ध्यान, सेवा धर्मी पुण्य आहे, इंद्रायणी काठी, पांडूरंग कांती, काळ देहाशी, मला दादला नको गं, येथे का रे उभा श्रीरामा, स्वामी समर्थ नामाचा, रात्र काळी घागर काळी, अरे कृष्णा अरे कान्हा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, अवघे गर्जे पंढरपूर, खेळ मांडीयला, नाम तुझे घेता देवा, वृंदावनी वेणू, सुंदर माझे जाते, कधी लागेल रे वेड्या, देरे कान्हा, कैवल्याच्या चांदण्याला, विठ्ठलाच्या पायी थरारली, अवघा रंग एक झाला या रचना सादर करुन नांदेडच्या कुसूम सभागृहात तुंडूब भरलेल्या रसिकांना भक्तीलीन केले.

कार्यक्रमाची संगतसाथ प्रमोद देशपांडे, पंकज शिरभाते, राजू जगदने, स्वप्नील धुळे, निखिल प्रधान, विश्वेश्वर जोशी आदींने केले. चैतन्य कुलकर्णी यांनी सुधीर फडके यांच्या विठ्ठल भक्तीच्या गितांची मेलडी सादर करुन कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. कार्यक्रमाचे निर्मिती सहाय्य रमेश मेगदे, संगीत संयोजन डॉ.प्रमोद देशपांडे, दिग्दर्शन विजय जोशी, ध्वनी व्यवस्था संतोष गट्टाणी यांची होती. कलांगण प्रतिष्ठाण व श्री स्वामी समर्थ मंदिर व अन्नछत्रच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.


