नांदेड| नांदेड-बीदर महामार्गावर असलेल्या मौजे ढाकणी शिवारात रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी धडकली. या अपघातात दोन युअवक जागीच ठार झाले असून, या घटनेमुळे ढाकणी गावावर शोककळा पसरली आहे. दिनांक ३१ जानेवारी रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.यात मयत झालेल्या तरुणात चंद्रकांत संभाजी कल्याणकर, वय २७ आणि विजय आनंदा कोल्हे वय २२ वर्ष, दोघेही ढाकणी ता. लोहा येथील आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, ढाकणी ता. लोहा शिवारात भुशाने भरून एका कारखान्याकडे जाणारा ट्रक क्रमांक टीएस ०७, यू, जे. ९५०६हा रात्रीच्या वेळी नादुरुस्त झाला. त्यामुळे हा ट्रक रस्त्याच्या मध्यभागी थांबला होता. तसेच ट्रकच्या पाठीमागे रिफ्लेक्टर अथवा रात्री चमकणारा दिशादर्शक फलक न लावता थांबविलेला होता. याचवेळी सिडको येथून दुचाकी क्रमांक एम. एच. २६ / बी. झेड ६९५३ ही भरधाव वेगाने येऊन उभ्या ट्रकवर आदळली. या अपघातात दुचाकीवरील चंद्रकांत संभाजी कल्याणकर व विजय आनंदा कोल्हे हे जागीच ठार झाले.

अपघातातील मयत चंद्रकांत कल्याणकर हा ढाकणी येथील एका कंपनीत कामाला होता. तर दुसरा विजय कोल्हे हा सिडको एमआयडीसी येथील एका कारखान्यात कामाला होता. दोघाही तरुणांच्या अपघाती मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत दोघाही तरुणांचे मृतदेह सोनखेड पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले.
