हिमायतनगर,अनिल मादसवार। येथील श्री परमेश्वर मंदिरात दिनांक 11 में नृसिंह जयंतीच्या शुभमुहूर्तावर हदगाव हिमायतनगर तालुक्याचे आमदार बाबुराव कदम कोहलीकर यांच्या पुढाकाराने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी यांच्या वतीने मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबिरात एकूण 1500 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी अंदाजे 500 रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.


मागील पाच वर्षांपासून आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या पुढाकाराने गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार मिळावा या उद्देशाने हदगाव आणि हिमायतनगर येथे स्वतंत्र शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे, त्याचं पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन आमदार बाबूराव कदम यांच्या हस्ते फीत कापून व विलास वानखेडे यांच्या हस्ते नारळ फोडून सकाळी 9 वाजता करण्यात आले, तत्पूर्वी सीमेवर वीरमरण आलेल्या शाहिद वीर सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, जिल्हाप्रमुख विवेक देशमुख, युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हडसनिकार, संभाराव लांडगे मामा, बबनराव कदम, मंचक कदम, युवा नेते भास्कर वानखेडे, विनय देशमुख, तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, श्याम रायेवार, गजानन तुपतेवार, निराधार समिती अध्यक्ष विजय वळसे, उपजिल्हाप्रमुख राजू पाटील भोयर, आशिष सकवान, गजानन चायल, रामभाऊ सूर्यवंशी, शहर प्रमुख गजानन हरडफकर, साईनाथ कप्पालवाड, ज्ञानेश्वर पुठेवाड, गौरव सूर्यवंशी, ज्ञानेश्वर लिंगमपल्ले, फेरोज कुरेशी, दिलीप ढोणे, आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

शिबीरात रक्तदाब, ब्लड शुगर, बरेच दिवसाबा ताप, किडनीचे आजार, हृदयरोग, अशक्तपणा, वारंवार चक्कर येणे, जुनाट हृदयरोग, छातीत दुखणे, धाप लागणे, छातीत धडपड करणे इत्यादी मेडिसिन तज्ज्ञांच्या मार्फत तपासणी करून गरजू रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या शिबीरापैकी अनेक रुग्णांवर आवश्यक असल्यास शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

तसेच या शिबिरात मोतियाबिंदू शस्त्रक्रिया, तिरळेपणा, हायड्रोसिल, हर्निया, अंगावरील गाठी, आतड्याचे आजार, मुतखडा, पोट विकार, गलगंड (थायरॉईड), मासिक पाळी, पांढरे पाणी जाणे, हृदयाला छिद्र, मतिमंद, मुलांचा विकास, कुपोषण, लहान मुलांचे सर्व आजार, कान नाक घसा, संधिवात, मणक्यात गॅप, वाकलेले पाय, फॅक्चर, खाज, गचकरण, अंगावरील पांढरे डाग, त्वचा विकार, श्वसनरोग, दमा, बरेच दिवसाचा खोकला तोंडाद्वारे पडणारे रक्ताचे ठसे, दातांचे आजार, दुभगलेले पोट, टाळूरोग, आदी आजाराच्या 1600 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, यापैकी अंदाजे 500 रुग्णांवर शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याने त्यांना लवकरच म्हणजे दिनांक १४ रोजी पुढील उपचार व शास्त्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.