श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर–किनवट राष्ट्रीय राज्यमार्गावरील नखेगाव फाट्याजवळ महिंद्रा इको चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून चारचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.


माहूर येथील रुपेश गुलाबराव आराधे (वय २९) हे वाई बाजार येथे राहणाऱ्या बहिणीस भेटण्यासाठी महिंद्रा इको (क्रमांक एम.एच. २७ ए.आर. ९२१०) या वाहनाने गेले होते. परत येत असताना नखेगाव फाट्याजवळ समोरून येणाऱ्या दुचाकीला त्यांच्या वाहनाची जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार जयराम कोमलप्रसाद मिश्रा (वय ६०, रा. सायफळ, ता. माहूर) हे शाईन कंपनीच्या मोटर सायकलवर (क्रमांक एम.एच. ए.जे. १५८९) प्रवास करत होते.

धडकेनंतर मोटरसायकल ५०० मिटर दूर फेकली गेली. या भीषण अपघातात जयराम मिश्रा यांचा जागीच मृत्यू झाला, तर रुपेश आराध्ये हे गंभीर जखमी झाले. जखमी आराध्ये यांच्यावर माहूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर मंगेश वाघमारे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले.घटनेची माहिती मिळताच माहूरचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, सहायक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतक व जखमींना रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



