हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | हिमायतनगर तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर लक्षणीयरीत्या वाढला असून, त्यामुळे शेतकरी व शेतमजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर दि. २९ डिसेंबरच्या रात्री सरसम बु. ते खडकिबाजार पांदण रस्त्यालगत असलेल्या शेतात बिबट्याने हरणावर हल्ला करून शिकार केल्याची घटना घडली.


सरसम बु. येथील शेतकरी संभाजी भुसारे पाटील यांच्या हरभऱ्याच्या शेतात ही घटना घडली. सकाळी शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना हरणाचे अवशेष आढळून आले. ही बाब समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून अनेकांनी रात्रीच्या वेळी शेताकडे जाणे टाळण्यास सुरुवात केली आहे.


दरम्यान, तालुक्यातील खडकिबाजार शिवारात माजी सरपंच पांडुरंग गाडगे यांच्या शेतातील विहिरीत एका वर्षांखालील हरणाचे पिल्लू मृत अवस्थेत आढळून आले. या घटनेनेही नागरिकांमध्ये भीती अधिकच वाढली आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून परिस्थितीचा आढावा घेतला.


बिबट्याचा वावर निश्चित झाल्याने वनविभागाकडून नागरिकांना विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतात एकट्याने जाणे टाळावे, रात्रीच्या वेळी पुरेशा प्रकाशाची व्यवस्था ठेवावी तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ वनविभागाला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.“तालुक्यात बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने उपाययोजना करून पिंजरा लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.”

बिबट्याच्या हल्ल्यानंतरचे अवशेष वनविभागाकडून ताब्यात
सरसम बु. येथील भुसारे यांच्या शेतात बिबट्याने हरणाची शिकार केल्यानंतर उरलेले अवशेष तसेच खडकिबाजार शिवारात विहिरीत आढळलेले हरणाचे मृत पिल्लू वनविभागाने ताब्यात घेऊन नियमानुसार विल्हेवाट लावली. वनपरिक्षेत्र अधिकारी मंगेश कदम, वनपाल डी. डी. ईभुते यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक कारवाई केली.


