श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| बातमीदार हा सर्वसामान्य जनतेची बाजू मांडणारा,भ्रष्ट राजकारणी आणि अधिकाऱ्यांची पोलखोल करणारा आणि समाजावरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा असतो, अशी सामान्य नागरिकांची भावना असते, मात्र काही भानगडबाज मंडळींनी पत्रकारितेच्या नावाखाली आपल्या तुंबड्या भरण्याचा घाट घातला आहे. सध्या माहूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात खासगी वाहनांवर प्रेस लिहिलेले आणि ऑनलाइन मीडियाच्या नावाखाली कसलीही नोंदणी नसलेले काही महाटख स्वयंघोषित बोगस पत्रकार राजकिय मंडळीवर,सर्वसामान्य नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये आपली छाप पाडण्यासाठी विविध उद्योग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.


दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर प्रेस लिहून आम्ही ऑनलाइन मीडियाचे पत्रकार आहोत, असे प्रेस लिहिलेले ओळखपत्र गळ्यात घेऊन मोठ्या अविर्भावात फिरून नागरिकांसह शासकीय अधिकारी, राजकारणी मंडळींना त्रास देत असल्याच्या घटना माहूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत.ज्यांना पत्रकारितेबद्दल “ओ की ठो’ कळत नाही. अशा काहींचा या क्षेत्राशी सुतरामही संबंध नाही, अशा मंडळींनी पत्रकारितेच्या नावाखाली दुकानदारी सुरू केल्याचे आणि काही तथाकथित संघटनांशी सलगी करण्याचे प्रयत्न चालविल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे.

सध्या विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असतांना राजकारणी आप-आपल्या परीने उमेदवारीसाठी तर काही मंडळी प्रचारात उतरली आहे.तर दुसरीकडे या बोगस पत्रकारांचा सुळसुळाट खूपच मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसत आहे. ज्याप्रमाणे पावसाळ्यात कुत्र्यांच्या छत्र्या उगवतात, तसेच आगामी निवडणुका व सनासुदीच्या तोंडावर बोगस पत्रकार पुन्हा एकदा उगवले आहेत.विना नोंद असलेले वृत्तपञ व बोगस वेबसाईटचे पत्रकार हे मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत.पञकारीतेचा भुरखा घालून अवैध व्यवसाय करणार्याची संख्या ही मोठ्या प्रमाणात समोर येत आहे.

पञकारीतेच्या क्षेत्रात नव्याने आलेले काही पत्रकार प्रलोभनाशिवाय काम करतात अशा मंडळीची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या ऐवढीच मर्यादित आहे. याशिवाय संकेतस्थळावर सामाजिक हिताच्या विषयांवर लिखाण करणारे आणि त्याचा सामाजिक हितासाठी प्रसार करणारेही आहेत. मात्र कोणत्याही वृत्तपत्रामध्ये काम न करणारे व केवळ संकेतस्थळांवर ‘लुटीचे अर्थशास्त्र’ राबविणारे बोगस पत्रकारही तयार झाले आहेत. वेगवेगळे संकेतस्थळ आणि ब्लॉगवर लिखाण करून सामान्य नागरिक, शासकीय अधिकारी आणि राजकिय मंडळीवर आपला वचक राहावा म्हणून या बोगस पत्रकारांचा त्रास वाढला असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्या आहेत.

माहूर तालुक्यात सध्या शेकडो वृत्तपञ व वेबसाईट उदयास आले असून त्यापैकी बहुतांश वृत्तपञ हि पिडीएफ स्वरुपाचे असून त्या वृत्तपञांने आज तगायत सूर्यदर्शन घेतले नाही.अशा वृत्तपञात बोगस पञकारांनी पाऊल टाकत मी पञकार असल्याची ओळख निर्माण करुण जाहिरातीच्या नावाखाली खिसे कापण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. अशा महाटाक व बोगस पञकार मंडळींचा अक्षरशः वैताग आल्याचे काही नागरिक, अधिकारी, राजकारणी सांगत आहेत. अशा मंडळींकडून काही जणांसी संधान साधून एखाद्याची ठरवून बदनामी करण्यासाठी “सुपारीबाज’ पत्रकारिताही उदयास आणली जात असून ती समाजासाठी मारक असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.