हिमायतनगर (उत्कर्ष मादसवार) नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा येथे आज (13 नोव्हेंबर) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण दुर्घटना टळली. पैनगंगा नदीच्या प्रवाहात पाच महिला मजूरदारांसह दोन लहान मुले अडकली होती. स्थानिक नागरिक, महसूल व पोलिस प्रशासनाच्या तत्परतेमुळे सर्वांना सुखरूप वाचवण्यात यश आले.


मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी गेलेल्या मजूर महिलांचा हा समूह त्यांच्या मूळ गावी एकंबा येथे परतत होता. दरम्यान, पैनगंगा नदी पात्रातून जात असताना मुरली येथील उच्च पातळी बंधाऱ्यातून पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आल्याने नदीचा प्रवाह अचानक वाढला. त्यामुळे या महिलांसह दोन बालके नदीच्या मध्यभागी अडकली.



अडकलेल्या मजूरदारांमध्ये गजराताई काटेवाड, कोमल काटेवाड, सुवर्णा गांदरवाड, कामिनी गांदरवाड, अनुसया दिगंबर तळमवाड, विनायक गांदरवाड (८ महिन्यांचे बालक) व पाच वर्षीय मुलगी यांचा समावेश असून, घटनेची माहिती मिळताच इस्लापूर येथील सपोनि उमेश भोसले, बिटरगाव येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग शिंदे, तसेच पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर किनवटच्या तहसीलदार डॉ. शारदा चौंडेकर यांनी देखील घटनास्थळी पोहोचून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना परिस्थितीची सतत माहिती दिली.



दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून केलेल्या प्रयत्नांमुळे ही बचाव मोहीम यशस्वी ठरली. यात भोई रामराव साहेबू गंटलवाड, दत्ता उठ्ठलवाड, अनिल शंकर भट्टेवाड, बालू माधव चोपलवाड, सुनील शंकर भट्टेवाड, पांडुरंग मागीरवाड यांनी तराफा व दोरीच्या साहाय्याने नदीत उतरून सर्वांना सुरक्षित बाहेर काढले.


या मोहिमेत पोलिस कर्मचारी कोमलकांनी, ओमप्रकाश भिडेवार, प्रफुल जाधव, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी सचिन भालेराव, जेपी दाऊद खान, तलाठी अक्षय महाले, शुभम जेलेवाड, पोलीस पाटील रवी खोकले, तसेच अमोल राठोड आणि इतर ग्रामस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

यावेळी तहसीलदार डॉ. चौंडेकर यांनी सांगितले की, स्थानिक पोलिस व ग्रामस्थांच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठी दुर्घटना टळली असून सर्व सात जण सुखरूप आहेत.


