नांदेड| ‘मराठी भाषा’ ही एक प्राचीन आणि सर्वोत्तम भाषा आहे. या भाषेने हजारो वर्षात अनेक वळणे घेतली आहेत. महाराष्ट्राची ओळख मराठी भाषेमुळेच आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आता मराठी भाषेची वाटचाल अभिजात भाषेकडून ‘प्रगत ज्ञान’ भाषेकडे व्हायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री. लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.


केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा जाहीर केल्यामुळे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने ‘अभिजात मराठी भाषा ज्ञान-विज्ञानाची भाषा कशी बनेल?’ या विशेष व्याख्यान प्रसंगी श्री. देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. एन. मोरे, विद्यापीठाचे मराठी भाषा अधिकारी डॉ. पी. विठ्ठल, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर यांची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना श्री. देशमुख म्हणाले की, ‘मराठी भाषिकांना कोणतीही गोष्ट सहजपणे मिळालेली नाही. त्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. अभिजात भाषेसाठीसुद्धा असाच संघर्ष करावा लागला आहे. अर्थात मराठी भाषा ‘अभिजात’ झाली म्हणजे आपले काम संपले असे नाही. आपल्या भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवेत. मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करून मराठीला ज्ञानसंपन्न करायला हवे. शाश्वत उत्पन्न असणारा वर्ग आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमात टाकतो. त्यामुळे श्रीमंत इंग्रजी विरुद्ध गरीब मराठी असे एक विसंगत चित्र समाजात निर्माण झाले आहे. हे चित्र बदलायला हवे. एकविसाव्या शतकात ज्ञान हेच भांडवल आहे.

आपली वाटचाल ज्ञानप्रधान युगाकडे होत आहे. या युगाला साजेशी अशी मराठी भाषा करायला हवी. मराठी भाषा ही अर्थार्जनाची आणि व्यवसायाची किंवा रोजगाराची बनली तरच तिचा विकास होईल. मराठी भाषा ही शिक्षणाचे माध्यम बनायला हवी. मराठी भाषेत पाठ्यपुस्तके आणि संदर्भग्रंथांची निर्मिती झाली तर मराठी विषयीची अनास्था दूर होऊ शकेल. आपण प्रत्येकाने मराठी भाषेविषयीची बांधिलकी दाखवली पाहिजे. आपल्या अभिजात भाषेतील संचित इंग्रजी भाषेत जायला हवे. त्यासाठी सरकारने अनुवाद अकॅडमीची स्थापना करायला हवी. तसेच व्हर्च्युअल विद्यापीठाची देखील स्थापना करायला हवी. तसे झाले तरच मराठी भाषा ज्ञान-विज्ञानाची भाषा बनू शकेल.’ असेही श्री.लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले.

यावेळी ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत आणि प्रकाशक श्री निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा सत्कार कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. प्रारंभी विद्यापीठाचे मराठी भाषा अधिकारी तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. पी. विठ्ठल यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पृथ्वीराज तौर यांनी केले, तर आभार डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी मानले. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन: ‘अभिजात मराठी भाषा आधुनिक ज्ञान-विज्ञानाची भाषा कशी बनेल?’ या विषयावर व्याख्यान देताना श्री. लक्ष्मीकांत देशमुख, व्यासपीठावर कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डॉ. पी. विठ्ठल, प्रा. दत्ता भगत, डॉ. डी.एन. मोरे, डॉ पृथ्वीराज तौर…