नांदेड| शीख धर्माचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम सोहळ्यानिमित्त नांदेडच्या मोदी मैदानावर केवळ धार्मिकच नव्हे तर व्यापक जनकल्याणकारी उपक्रम राबविण्यात येत आहेत. लाखो भाविकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभाग व मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, याला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


या शिबिरात २५० हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक तैनात असून, भाविकांना मोफत आरोग्य तपासणी, सल्ला व औषधोपचार दिले जात आहेत. मोदी मैदान परिसरात १२ सुसज्ज वैद्यकीय दालने, दोन ओपीडी व पाच खाटांचे तात्पुरते रुग्णालय उभारण्यात आले आहे.

हाडांचे विकार, नेत्ररोग, मधुमेह, हृदयरोग, स्त्रीरोग, क्षयरोग तसेच असंसर्गजन्य आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करण्यात येत आहेत. विशेष म्हणजे एंडोस्कोपी तपासणी व कर्करोग स्क्रिनिंगसारख्या महागड्या तपासण्या पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयामार्फत नेत्र तपासणी करून गरजू रुग्णांना मोफत चष्मे व चालण्यासाठी आधाराच्या काठ्या वितरित करण्यात येत आहेत.


पहिल्याच दिवशी ५,२४९ रुग्णांचा लाभ
समागमाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ५,२४९ भाविकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यामध्ये २,९६७ जणांची नेत्र तपासणी, १,०८० रुग्णांची हाडांची तपासणी, ६४२ जणांची एनसीडी स्क्रिनिंग, १३१ बालकांची आरोग्य तपासणी, ७७ महिलांची स्त्रीरोग तपासणी, ८८ रुग्णांची ईसीजी, तर ३२ जणांची मोतीबिंदू तपासणी करण्यात आली. तसेच १,७९९ रुग्णांना चष्मे, ५८७ जणांना आधाराच्या काठ्या वितरित करण्यात आल्या.


आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्था सज्ज
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी ५ खाटांचा आयसीयू, तसेच एएलएस प्रणालीच्या २५ व बीएलएस प्रणालीच्या ४० अशा एकूण ६५ रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी दिली.
भाविकांकडून समाधान व्यक्त
आरोग्य शिबिराचा लाभ घेतलेल्या भाविकांनी आयोजकांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचे कौतुक केले. आवश्यक तपासण्या, औषधे, चष्मे व आधारसामग्री मोफत मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.
शहीदी समागमाच्या निमित्ताने राबविण्यात आलेल्या या व्यापक आरोग्य उपक्रमामुळे धार्मिकतेसोबतच मानवी सेवेला प्राधान्य देणारा आदर्श उपक्रम म्हणून या आरोग्य शिबिराकडे पाहिले जात आहे.

