नांदेड| “हिंद-दी-चादर” अंतर्गत श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड शहरात दि. २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी मोदी मैदान, नांदेड येथे भव्य-दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सामाजिक संस्था, संघटना व स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा व सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.


या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अमोल इंगळे, कार्यकारी अधिकारी व समन्वयक डॉ. जगदीश सकवान, तहसीलदार संजय वारकड यांच्यासह विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितले की, कार्यक्रमस्थळी सुमारे ३५० स्टॉल्स उभारण्यात येणार असून, प्रत्येक सामाजिक संघटनेने किमान ५ ते १० स्टॉल्स उभारून भाविकांसाठी सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. हे स्टॉल्स दोन्ही दिवस सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. प्रत्येक स्टॉलवर संबंधित संघटनेचे बॅनर लावण्यात येणार असून, भाविकांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाद, अल्पोपहार, माहिती व विविध सेवा सुविधा पुरविण्याचे आवाहन त्यांनी केले.


तसेच दि. २४ जानेवारी रोजी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा येथून निघणाऱ्या पालखी मिरवणुकीचे स्वागत करून मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने, सेवा व्यवस्थेसाठी स्वयंसेवकांनी अधिकाधिक योगदान द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.


या दोन दिवसीय कार्यक्रमासाठी ८ ते १० लाख भाविक नांदेडमध्ये दाखल होण्याची शक्यता असून, सर्व प्रशासकीय यंत्रणांसह सामाजिक संघटनांनी सज्ज राहणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. कार्यक्रमाचा प्रचार शाळा, महाविद्यालये व सामाजिक माध्यमांद्वारे व्यापक पातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमस्थळाबाहेर तसेच पार्किंग परिसरात स्टॉलसाठी आवश्यक साहित्य आणण्यासाठी वाहने व संबंधित व्यक्तींना प्रवेश पासेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही बैठकीत सांगण्यात आले.
हा कार्यक्रम केवळ धार्मिक नसून सामाजिक ऐक्य, सेवा व प्रेरणा देणारा ऐतिहासिक सोहळा असल्याने, जास्तीत जास्त सामाजिक संघटनांनी पुढे येऊन सहभाग नोंदवावा व “हिंद-दी-चादर” शहीदी समागम यशस्वी करण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी कार्यक्रमाच्या एकूण नियोजनाची सविस्तर माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी उपस्थितांना दिली.

