नांदेड | जिल्ह्यातील गुन्हेगारीवर निर्णायक आघात करत स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड व पोलीस ठाणे वजिराबाद यांच्या संयुक्त पथकाने बॅग लिफ्टींग करणाऱ्या अंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत आरोपींकडून 18 लाख रुपये रोख जप्त करण्यात आले असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.


वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीतील जुना मोंढा परिसरात झालेल्या बॅग लिफ्टींगच्या घटनेने शहरात खळबळ उडाली होती. या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी मा. अविनाश कुमार (पोलीस अधीक्षक, नांदेड) यांच्या आदेशानुसार “ऑपरेशन फ्लश आऊट” अंतर्गत विशेष तपास मोहीम राबविण्यात आली.

200 सीसीटीव्ही फुटेज, सायबर व NatGrid तपास
पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली चार विशेष पथके तयार करून तब्बल 200 सीसीटीव्ही फुटेज, सायबर फूटप्रिंट्स व NatGrid तपशील तपासण्यात आले. तपासाचा धागा महाराष्ट्राबाहेर जाताच पथके कर्नाटक व तेलंगणा येथे रवाना झाली.


कर्नाटकात सापळा; 18 लाखांची जप्ती
दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी कर्नाटकातील भद्रावती (जि. शिमोगा) येथे सापळा रचून मुख्य आरोपी चंद्रशेखर ओमप्रकाश छत्री यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 18,00,000 रुपये रोख जप्त करण्यात आले. चौकशीत त्याने साथीदारांसह बॅग लिफ्टींगचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी आरोपी चंद्रशेखर ओमप्रकाश छत्री, अजय बाबु जाधव उर्फ अवज फकीरा नायडु
नंदकुमार दिलीप चंदु उर्फ शंकर राजु भोई, अंजन्नेलु ओमप्रकाश छत्री (सर्व रा. भद्रावती, जि. शिमोगा, कर्नाटक) यांना अटक करण्यात आली आहे. ही धडक कारवाई मा. अर्चना पाटील (अपर पोलीस अधीक्षक, भोकर), सुरज गुरव (अपर पोलीस अधीक्षक, नांदेड) व अश्विनी जगताप (उपविभागीय पोलीस अधिकारी, कंधार) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सहभागी अधिकारी व अंमलदारांचे विशेष कौतुक केले आहे. नांदेड पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांमध्ये दहशत तर नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.

