हिमायतनगर (अनिल मादसवार) ऐन दिवाळीच्या पर्व काळतही शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक भागांत कचऱ्याचे ढिगारे साचले असून, त्यातून दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत आहे. स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या तरीही नगरपंचायत प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, दरम्यान आमदार बाबुराव कदम कोळेकर यांना देखील दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आले असता दुर्गंधी सह घनकचऱ्याच्या ढिकाऱ्याचा सामना करावा लागला आहे. अनेक नागरिकांनी आमदार महोदयाच्या निदर्शनास ही बाब आणून देत नगरपंचायतीच्या नाकर्तेपणा बाबत नाराजी व्यक्त केली आहे.


आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना, शहरातील नागरिकांचा प्रश्न आहे
“रस्त्यांवर साचलेला कचरा, घाण आणि दुर्गंधी प्रशासनाच्या नजरेत का येत नाही?” हिमायतनगर नगरपंचायतीवर सध्या प्रशासनाचा आहे प्रशासक असताना देखील त्यांचेही याकडे जाणीवपूर्वक होत असल्याने शहरातील नागरिकांना सणासुदीच्या काळातही दुर्गंधी व घाणीच्या साम्राज्यासह आरोग्याचा समस्येचा सामना करावा लागत आहे.


हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यांसह परमेश्वर मंदिर परिसर, बस स्टॉप, व्यापारी गल्ली, मुख्य रस्ता असलेला सराफालाईन ते पोलीस स्थानकापर्यंत, अस्वच्छतेचे चित्र दिसून येत आहे. नुकते शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी दिवाळीच्या काळात तरी साफसफाई करा व नागरिकांना दुर्गंधी पासून दिलासा देण्याची केली होती. मात्र गेंड्याची कातडी पांघरलेल्या नगरपंचायतच्या प्रशासकीय अधिकारी व इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी शहरातील स्वच्छतेकडे व घाण उचलण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



निवडणुकीच्या तोंडावर भावी उमेदवाराचे मोठी गर्दी होत असताना कोणीही शहरातील स्वच्छता व्यवस्था बाबत आवाज का उठवत नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. तसेच स्थानिक नागरिकांनी आणि सुजाण नागरिक संघटनांनी निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी व अधिकारी वर्गाने ही बाब नांदेड जिल्हाधिकारी महोदयांच्या निदर्शनास आणावी, अशी मागणी केली आहे.


आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नगरपंचायत प्रशासनाला सूचना हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात केरकचरा साचून आहे तात्काळ हा केरकर उचलून शहरवासीयांना दुर्गंधीच्या समस्या पासून दिलासा द्या. अशा सूचना केल्या मात्र तरी देखील याकडे नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केले असल्याचे दुसरे दिवशी शुक्रवारी देखील ठीक ठिकाणी घनकचरा जशास तसा दिसून आल्यावर समोर आले आहे.
हिमायतनगरला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात यावा
हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, नगरपंचायत अस्तित्वात झाल्यानंतर गत पाच वर्षापासून येथे निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे नगरपंचायतीवर या ना त्या अधिकाऱ्याकडे प्रभारी चार्ज देऊन कारभार चालवीला जातो आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांना घाण, स्वच्छता, पिण्याच्या पाण्यासह आरोग्याचा प्रश्न भेडसावत आहे. प्रशासन केवळ वसुलीला प्राधान्य देऊन नागरी समस्या सोडविण्यात चाल ढकल करत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणीचा सामना करावा लागत असून या सर्व समस्येपासून दिलासा देण्यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमणे गरजेचे असल्याचे मत नागरिक बोलून दाखवत आहेत.


