नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकसहभागातून दिवाळीच्या सात दिवसात एक क्विंटल मिठाई “भाऊचा माणुसकीचा फ्रिज”, येथे उपेक्षितांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.


यावर्षी या उपक्रमामध्ये रुपेश वट्टमवार, डॉ. सुनिता गोधमगावकर, शिक्षणाधिकारी सविता बिरगे , मोहित व रेणुका सोनी, चंद्रकांत गंजेवार, शोभा नंदलवार, सुरेश पळशीकर, अविनाश चिंतावार मुंबई यांनी प्रत्येकी दहा किलो मिठाई उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय दोन दानशूर नागरिकांनी अज्ञात दाता म्हणून सहभाग घेतला आहे. १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी दहा वाजता दररोज वेगवेगळी दहा किलो मिठाई “भाऊचा माणुसकीचा फ्रिज”, पंचवटी हनुमान मंदिरा जवळ, महावीर चौक नांदेड येथे अन्नदात्यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे.यामध्ये बुंदी लाडू, करंजी, बेसन लाडू, काला जामुन, रवा लाडू, म्हैसूर पाक, बालुशाही याचा समावेश आहे.



याशिवाय लहुजी साळवे अनाथाश्रम धनगर टेकडी, संध्या छाया वृद्धाश्रम गजानन महाराज मंदिराजवळ, सुमन बालगृह हनुमान गड येथे देखील प्रत्येकी दहा किलो मिठाई वाटप करण्यात येणार आहे. भाजपा नांदेड महानगर, लायन्स क्लब नांदेड सेंट्रल व अमरनाथ यात्री संघ यांच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून भाऊचा माणुसकीचा फ्रिज या उपक्रमांतर्गत पंचवटी हनुमान मंदिर नांदेड या ठिकाणी दररोज किमान ४० ते १२० जेवणाचे डबे खऱ्याखुऱ्या गरजूंना देणगीदारांच्या हस्ते वाटप करण्यात येतात.


वर्षभरातील महत्त्वाच्या सणांच्या दिवशी जेवणाच्या डब्यासोबत मिठाई देखील वाटप करण्यात येते. दरवर्षी दिवाळी दरम्यान वाटप करण्यात येणाऱ्या एक क्विंटल मिठाईचा लाभ अनेक गरजू घेत असतात. ज्यांना मिठाई पाहिजे असेल त्यांनी १७ ते २३ ऑक्टोबर दरम्यान दररोज सकाळी दहा वाजता महावीर चौक नांदेड येथील फ्रिज जवळ उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक दिलीप ठाकूर यांनी केले आहे.



