नांदेड| जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील एकंबा ग्रामपंचायतमध्ये सरपंच, उपसरपंच व तत्कालीन ग्रामसेवक यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासनाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी अखेर ३० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.


ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी नरेगा योजनेअंतर्गत विहीर, पाणी फिल्टर मशीन, अंगणवाडी खेळ साहित्य, अंतर्गत नाली व इतर विकासकामांसाठी आलेल्या निधीचा गैरवापर करून ४० ते ४५ लाख रुपये परस्पर हडपले आहेत. याबाबत ग्रामस्थांनी मागील वर्षी पंचायत समितीकडे तक्रार केली आणि तीन वेळा आमरण उपोषण केले. प्रशासनाने या प्रकारांची सखोल चौकशी केली आणि भ्रष्टाचाराचे लेखी पुरावे दिले असले तरी दोषींविरुद्ध अजूनही कारवाई झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी महसूलमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे देखील लेखी तक्रार सादर केली आहे.


यशवंत मारोती वाघमारे, रवीकुमार भोजू कानिंदे, श्रीरंग दत्ता सूर्यवंशी, राजू चंद्रकांत देशपांडे, रमेश हनुमंत लोमटे, गणेश घुगराळे व इतर ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, संबंधित पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी, तसेच तहसील व जिल्हा परिषदेतील अधिकारी या प्रकरणात सहभागी असल्यास त्याची चौकशी करणे आवश्यक आहे. तीन वेळा उपोषण करून देखील कारवाई न झाल्यास, ग्रामस्थ ३० सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मदहन करण्यास प्रवृत्त होतील. ग्रामस्थांनी स्पष्ट केले की, भ्रष्टाचाराचे पुरावे असूनही तातडीने निलंबनाची कारवाई न झाल्यास होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.




