नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठाचा वर्धापन दिन यानिमित्ताने दि.११ ते १९ सप्टेंबर या दरम्यान विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि बौद्धिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. दि.२८ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीनुसार विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.


दि.११ सप्टेंबर रोजी जिल्हास्तरावर वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” हा विषय असणार आहे. यास्पर्धा लातूर येथील जयक्रांती महाविद्यालय, परभणी येथील शिवाजी महाविद्यालय, हिंगोली येथील आदर्श महाविद्यालय, आणि नांदेड येथील एन. एस. बी. महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. तर निबंध स्पर्धेसाठी “उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने” व “मराठवाड्यातील उच्च शिक्षण: भविष्यकालीन दिशा” हे दोन विषय असणार आहेत. यास्पर्धा लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, परभणी येथील महिला महाविद्यालय, हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालय आणि नांदेड येथील सायन्स कॉलेज येथे आयोजित करण्यात आली आहे.


दि.१२ सप्टेंबर रोजी भित्तिपत्रके, ग्रंथ प्रदर्शन आणि रांगोळी स्पर्धा विद्यापीठातील ज्ञानस्रोत केंद्रामध्ये आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये भिंतीपत्रके हैदराबाद मुक्तिसंग्राम व विद्यापीठाचा वैभवशाली इतिहास यावर असणार आहेत. तर रांगोळी स्पर्धेचा विषय हैदराबाद मुक्तिसंग्राम असा आहे. दि.१३ सप्टेंबर रोजी विद्यापीठ स्तरावरील वक्तृत्व व निबंध स्पर्धा होणार आहेत. यामध्ये वक्तृत्व स्पर्धेसाठी “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” हा विषय असणार आहे. ही स्पर्धा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे. तर निबंध स्पर्धेसाठी “उच्च शिक्षणातील संधी आणि आव्हाने” व “मराठवाड्यातील उच्च शिक्षण: भविष्यकालीन दिशा” हे दोन विषय असणार आहेत. ही स्पर्धा विद्यापीठाच्या ज्ञानस्रोत केंद्र येथे आयोजित करण्यात आली आहे.


दि.१५ सप्टेंबर रोजी “हैद्राबाद मुक्तिसंग्राम समजून घेतांना” या विषयावर लातूर येथील दयानंद कला महाविद्यालय, परभणी येथील स्वा. सै. सुर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा, हिंगोली येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत आणि नांदेड येथील यशवंत महाविद्यालयामध्ये व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. दि.१६ सप्टेंबर रोजी पीपल्स कॉलेज, नांदेड येथे परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. या परिसंवादाचा विषय “राष्ट्रीय शिक्षण धोरण व मराठवाड्यातील उच्च शिक्षणाच्या दिशा” असा असणार आहे. तसेच याचदिवशी म्हणजे १६ सप्टेंबर रोजी विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

दि.१७ सप्टेंबर रोजी ध्वजारोहण सोहळा पार पडल्यानंतर लगेचच विद्यापीठ परिसर. उपपरिसर व विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयामध्ये वृक्षरोपण करण्यात येणार आहे. विद्यापीठाचा ३१ वा वर्धापन दिन आणि हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा ७८ वा वर्धापन दिन अशी दोन्ही मिळून १०९ रोपांचे वृक्षारोपण विद्यापीठ परिसरात करण्यात येणार आहे. याचबरोबर देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात घेण्यात येणार आहे. याच दिवशी विद्यापीठ परीक्षेतील चारही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी समवेत सहविचार सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.
१८ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२४ ते २०२५ या वर्षासाठीचे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये परीक्षा विभागामार्फत गुणवंत विद्यार्थ्यांना दिले जाणारे विविध पुरस्कार, विद्यार्थी विकास विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, क्रीडा विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत दिले जाणारे विविध पुरस्कार, विद्यापीठ कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेमधील विजेत्यांचा सत्कार, वर्धापन दिन सप्ताहात संपन्न झालेल्या विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडणार आहे.
१९ सप्टेंबर रोजी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त सन २०२४ ते २०२५ या वर्षासाठीचे विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये जीवनसाधना गौरव पुरस्कार, उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार, उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार, उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट संशोधन व तंत्रज्ञान योगदान पुरस्कार, पेटंट प्राप्त शिक्षक पुरस्कार, उत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी पुरस्कार, सेट/नेट उत्तीर्ण व पीएच.डी. प्राप्त शिक्षक/अधिकारी/कर्मचारी गौरव समारंभ पार पडणार आहे.
हुतात्मा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा. मराठवाड्यातील शिक्षण चळवळीचा ऐतिहासिक आढावा. विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचा व्यापक सहभाग. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाचा विशेष उपक्रम. असा सर्व व्यापक दृष्टिकोन या वर्धापन दिनानिमित्त होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मनोहर चासकर आणि प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कुलसचिव डॉ.ज्ञानेश्वर पवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठातील सर्व विभाग, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि संलग्न महाविद्यालयांच्या सहकार्याने हा वर्धापन दिन आणि हेद्राबाद मुक्तिसंग्राम दिनाचे स्मरण सोहळे यशस्वीपणे साजरे केले जाणार आहेत, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. डी. पवार यांनी कळविले आहे.


