कंधार, सचिन मोरे| सबंध महाराष्ट्रामध्ये सासर कडून सुनेचा छळ झाल्याच्या अनेक घटना आजही नेहमीच घडत असतात. चित्रपटातून देखील सासूला ‘खलनायिका’ दाखवल्याचे पहावयास मिळते. सासू व सुनेच्या नात्यांमध्ये भांडणाची परंपरा तशी जुनीच आहे. सासू व सुनेमध्ये नेहमीच वाद होत असतात. वादाचे रूपांतर अनेक वेळेस हाणामारी मध्ये झाल्याचे ऐकण्यात आहे. या सर्व कटू आठवणी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी जि.प.सदस्य रामचंद्र येईलवाड व परिवाराने ज्येष्ठ गौरी पूजनाच्या दिवशी लाकडी लक्ष्मीचा त्याग करत आपल्या तीन सुनांचे ज्येष्ठ व कनिष्ठ गौरी म्हणून पूजन करत समाजापुढे एक आगळा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गौरी पूजनाचे हे त्यांचे पाचवे वर्ष आहे.



हिंदू संस्कृतीमध्ये गौरी पूजनास अनन्य साधारण महत्व आहे. सबंध देशांमध्ये घराघरात लक्ष्मीचे मोठ्या थाटामाटात देखावे सजावट करत पूजन केले जाते. १ सप्टेंबर सोमवारी गौरीचे सर्वत्र जल्लोषात आगमन झाले अनेक ठिकाणी लाकडी, लोखंडी, मडक्याच्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गौरी बसवण्यात येतात. त्यावर मोठ्या प्रमाणात भरमसाठ खर्च देखील करण्यात येतो. या रूढी परंपरा मोडीत काढत लाकडी व लोखंडी लक्ष्म्यांचा त्याग करत आज वर्षा येईलवाड, प्रतिभा येईलवाड व मनीषा येईलवाड या तिन्ही सुनांचे रामचंद्र येईलवाड व कमलबाई येईलवाड यांनी मोठ्या थाटामाटात पूजन केले.


मुलगी व सून हीच खरी आपल्या घरची लक्ष्मी असते ही लक्ष्मी आपला वंश वाढवते त्यांच्या भविष्यातील पुढील पिढी घडवते. आपल्या लेकीमुळे,बहिणींमुळे ज्या घरी आपण कन्यादान करतो ती त्या घरची लक्ष्मी होय. ज्या महिलांचे लक्ष्मीपूजन करून मानसन्मान केला जातो तिथे लक्ष्मीचे पाऊले पडण्यास सुरुवात होते.



आज देशांमध्ये महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत असून हे सर्व चुकीचे घडत आहे. समाजातील सर्व कुटुंबांनी जर महिलांचा सन्मान केला त्यांना शिकण्याची समान संधी दिली, मुलींना सक्षम बनविले, मुलींना सामर्थ्य दिले तर कुठल्याच लाकडी लक्ष्मीची पूजा करायची गरज नाही. चालती बोलती लक्ष्मी हीच खरी लक्ष्मी होय. तुमची लक्ष्मी तुमची सून, बहीण,माय आहे. असा संदेश येईलवाड परिवाराने या उपक्रमातून दिला आहे.

यावेळी सुखदेव येईलवाड, पदमीनबाई येईलवाड, प्रा. गंगाधर येईलवाड, संगीताबाई येईलवाड,विनायक येईलवाड, शिवकांता येईलवाड,सुदर्शन येईलवाड, शशिकांत येईलवाड,डॉ. भास्कर येईलवाड, उपसरपंच प्रल्हाद घुमे , सुरेश येवतीकर, नागेश येईलवाड, लक्ष्मण मोरे ,शेख रहेमत यांची प्रमुख उपस्थिती होती.
