हिमायतनगर, अनिल मादसवार | मागील 24 तासांपासून मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.


हिमायतनगर तालुक्यातील दुय्यम बाजारपेठ असलेले कामारी गाव हे बहुसंख्य लोकसंख्येचे असून गावाला लागून असलेल्या पैनगंगा नदीला मोठा पूर आल्यामुळे नदीचे पाणी गावात शिरले. परिणामी गावातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.



हाता-तोंडाशी आलेले सोयाबीन व कापूस पिके पाण्याखाली जाऊन उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. यापूर्वी पावसा अभावी काही शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला होता. आता पुरामुळे पुन्हा मोठा धक्का बसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.



त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा विचार न करता शासनाने सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ठाम मागणी शेतकरी पुत्र महेश शिरफुले कामारीकर यांनी नांदेड न्यूज लाईव्हच्या माध्यमातून केली आहे.



