हिमायतनगर, अनिल मादसवार| मुसळधार पाऊस आणि इसापूर धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे पैनगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली असून, गांजेगाव पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे सलग विदर्भ–मराठवाड्याचा संपर्क तुटला असून दळणवळण ठप्प झाले आहे.


गांजेगाव पुलाची उंची वाढविण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. पावसाळ्यात वारंवार पूल पाण्याखाली जातो आणि मार्ग बंद पडतो. नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी ३०–३५ किमी वळसा घ्यावा लागतो. मात्र अद्यापही पूल उंचावण्याची मंजुरी मिळालेली नाही.



शेतकऱ्यांचे नुकसान – पैनगंगेत इसापूर धरणाचा विसर्ग आणि कयाधू नदीचा पुर मिसळल्याने आणि मुसळधार पावसामुळे नदीला महापूर येतो. यामुळे काठावरील शेतात पाणी शिरून शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.


महत्त्वाचा मार्ग ठप्प – हा पूल विदर्भ–मराठवाडा–तेलंगणा–आंध्र प्रदेश–कर्नाटकला जोडणारा आहे. माहूर, बासर, पोहरा देवी आदी तीर्थक्षेत्रांकडे जाणाऱ्या भाविकांची वाहतूक याच मार्गाने होते. तसेच विदर्भातील नागरिकांना जवळच्या रेल्वे प्रवासासाठीही हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे पुलावर पूर आला की संपूर्ण वाहतूक विस्कळीत होते.


जनतेची मागणी – गांजेगाव पुलाची उंची वाढवून नव्याने पूल उभारण्याची मागणी नागरिक, शेतकरी आणि ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत. पुलास मंजुरी मिळाल्यास पावसाळ्यात वारंवार संपर्क तुटण्याचा प्रश्न सुटेल, शेतकऱ्यांना पाणीसाठ्याचा फायदा मिळेल आणि गावकरी पूराच्या धोक्यापासून मुक्त होतील. नागरिकांनी खासदार नागेश पाटील व संबंधित विभागाने तातडीने पाठपुरावा करून पुलाची मंजुरी मिळवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
हिमायतनगर शहरातील नागरिकांनी काळजी घ्यावी – तहसीलदार टेमकर
हिमायतनगर तालुक्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. शहरातील अनेक भागांत पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्री. टेमकर यांनी नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले आहे. तसेच, ज्या नागरिकांच्या घरात अतिवृष्टीमुळे पाणी शिरले आहे त्यांची व्यवस्था शहरातील मंगल कार्यालयात करण्यात आली आहे, अशी माहितीही तहसीलदारांनी दिली. प्रशासनाने नागरिकांना शांत राहण्याचे, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि पूरस्थितीचा धोका वाढल्यास तातडीने मदतीसाठी महसूल प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


